जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाची घोषणा
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – ‘मराठी नाटकाला केवळ भारतापुरतं मर्यादित न ठेवता त्याला जगभरात पोचवायचं आहे. म्हणूनत हा निर्माता संघ आता जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ आहे. मराठी नाटकं, प्रेक्षक आणि लॉकडाऊन काळात अडचणीत सापडलेला प्रत्येक नाट्यकर्मी यांच्यासाठी काम करायचं आहे. शिवाय, मी विशिष्ट पक्षाशी संबंधित असलो तरी मी नाट्यनिर्माताही आहे. माझी अनेक वर्षं नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर आहे. माझ्या राजकीय पक्षाचा कोणताही संबंध इथे नसेल. नाट्यसृष्टीच्या भल्यासाठी आम्ही सगळे काम करू त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे’, असं सांगत नव्या निर्माता संघाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपली भूमिका मांडली.
जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाची अधिकृत घोषणा आज झूम मिटिंगद्वारे करण्यात आली.. ह्या वेळी अनेक पत्रकार आणि नाट्यकलावंत उपस्थित होते. नवीन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा ह्यावेळी करण्यात आली.. नाटक मोठं करण्याच्या दृष्टीने आणि नाट्यव्यवसाय आणखी सुरळीत सुरू होण्याच्या दृष्टीने ह्या नवीन निर्माता संघाची स्थापना करण्यात आली. लवकरच ह्या निर्माता संघाचा दृष्टिकोन आणि कार्यक्रम कळेल असं प्रवक्ते श्री. अनंत पणशीकर ह्यांनी सांगितले. जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ असे ह्या संघाचे नाव असल्याने नाटक करणारे सर्वच म्हणजे व्यावसायिक, हौशी, प्रायोगिक, समांतर सर्वांना सामावून घेण्याच्या दृष्टीने ही कार्यकारिणी विचार करेल अशी अपेक्षा एक प्रायोगिक नाट्य रंगकर्मी म्हणून करायला हरकत नाही..
सर्वसमावेशकतेच्या दृष्टीने ह्या निर्माता संघाने कार्य केले तर भविष्यात बाहेरगावच्या रंगकर्मीना मुंबई, पुण्यात नाटक करताना येणारे अडथळे दूर होऊ शकतील.. निवडण्यात आलेली नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष अमेय खोपकर , उपाध्यक्ष महेश मांजरेकर , कार्यवाह दिलीप जाधव, सह कार्यवाह श्रीपाद पद्माकर, खजिनदार चंद्रकांत लोकरे, प्रवक्ता अनंत पणशीकर , सदस्य – सुनील बर्वे , नंदू कदम, कायदा सल्लागार: हर्षद भडभडे, मार्गदर्शक – लता नार्वेकर , प्रशांत दामले.
जागतिक मराठी नाट्यकर्मी निर्माता संघाचे प्रवक्ते अनंत पणशीकर यांनी या संघाची माहीती दिली. शिवाय कार्यकारिणीची निवडही सूचक अनुमोदक पद्धतीने याच पत्रकार परिषदेआधी झाली. नाट्यगृहं सुस्थितीत आणणं.., चांगल्या नाटकांना रसिकांपर्यंत पोचवणं.., सर्वांना सोबत घेऊन जाणं हीच इच्छा हा संघ स्थापन करण्यामागे असल्याचं सांगितलं. ‘आम्हाला कोण चूक कोण बरोबर हे ठरवायचं नाही. त्या निर्माता संघाची आपली अशी विचारधारा आहे. आम्ही एका वेगळ्या विचारधारेने एकत्र आलो. तिथे राहून काही कामं होत नव्हती. मग अशावेळी आपणच ती का करू नयेत असा विचार आल्याने हा संघ स्थापन झाला. आता संघासमोरची उद्दीष्टे आदी यथावकाश आम्ही देऊ असं यावेळी नव्या संघाचे उपाध्यक्ष महेश मांजरेकर यांनी सांगितलं.
दुसऱ्यांची रेष पुसण्यात आम्हाला स्वारस्य नाही तर स्वतःची रेष मोठी करण्यात आम्हाला आनंद आहे असं प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. अमेय खोपकर ह्यांनी ह्या प्रसंगी केले ते सकारात्मक वाटले..याप्रसंगी उपस्थितांनी सर्व कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्यात.







