कोल्हापूर : भर चौकात तरुणावर कोयत्याने हल्ला

knife-attack

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथील अभिषेक अशोक पाटील (वय 24) या तरुणावर सहा ते सातजणांच्या जमावाने कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. डोक्यावर वर्मी हल्ला झाल्याने प्रकृती चिंताजनक बनली आहे. येथील गंगावेस चौकात बसथांब्याजवळ सोमवारी रात्री ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत हल्लेखोर पोलिसांच्या हाताला लागले नव्हते.

तरुणावर खुनी हल्ला झाल्याने अभिषेकच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी रात्री शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली. प्रकृती चिंताजनक बनल्याने तणावाचे वातावरण होते. लक्ष्मीपुरी तसेच राजवाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी, पोलिसांनी घटनास्थळासह रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र, हल्लेखोरांची नावे, हल्ल्याचे कारण स्पष्ट झाले नव्हते. अभिषेक हा मिरजकर तिकटी येथील एका फोटो लॅबमध्ये कामाला आहे. सायंकाळी साडेसातला काम आटोपून मित्र विक्रम गुरव (22, रा. हिरवडे, ता. करवीर) याच्यासमवेत गावाकडे जाण्यासाठी गंगावेस येथील केएमटी बसस्थानकावर आला. दोघेही बसस्थानकाच्या पिछाडीत बसच्या प्रतीक्षेत होते.

विक्रमला घरातून मोबाईल आल्याने तो काही अंतरावर जाऊन बोलत थांबला. नेमके याचदरम्यान सहा-सातजणांनी अभिषेकला घेरले. कोयत्याने त्याच्यावर हल्ला केला. अनपेक्षित झालेल्या प्रकारामुळे अभिषेक जीवाच्या आकांताने किंचाळू लागला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर सर्व हल्लेखोर तेथून पसार झाले.

तरुण मित्र रक्ताच्या थारोळ्यात तडफडत असल्याचे पाहून भेदरलेल्या विक्रमने चौकातील लोकांना मदतीसाठी याचना केली. चौकातील रिक्षाचालकांनी गंभीर अवस्थेतील तरुणाला शासकीय रुग्णालयात हलविले. डोक्यासह छातीवर, पाठीवर व हातावर कोयत्याने वर्मी हल्ला केल्याने प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अनोळखी तरुणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. भरचौकात झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here