सरकारी अधिकारी असल्याचे सांगत कारखानदाराची केली फसवणूक

मुंबई (संपादक सुनिल पाटील) – कुरार पोलीस ठाणे हद्दीतील शिवशक्ती एन्टरप्रायजेस, मालाड पूर्व येथील कारखान्यात महेंद्र जाधव व त्याच्या साथीदारांनी प्रवेश केला. सरकारी अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी कारखान्याच्या मालकाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, मंगळवार दि. २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता परशुराम देवासी हे कारखानदार त्यांच्या शिवशक्ती एन्टरप्रायजेस येथे असतांना महेंद्र जाधव व त्याच्या साथीदारांनी तिथे येत, आपण सरकारी अधिकारी असून, कारखान्याची तपासणी करण्यास आलो असल्याचे सांगितले. त्यानंतर तुम्ही हा कारखाना अवैधरित्या चालवित आहात, अवैधरित्या ॲसिडचा साठा केला आहे तसेच बालकामगार ठेवले असून, मास्कचा वापर करत नाहीत यावर कारवाई करण्याची धमकी देत त्यांच्याकडून दीड लाख रुपये घेतले. यानंतर परशुराम देवासी यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली असता, कुरार पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी गुन्हा नोंद करुन घेतला.

सदर गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत, पोलिस उपायुक्त, परिमंडळ 12 डॉ. स्वामी, सहायक पोलिस आयुक्त , समतानगर विभाग राजेंद्र मोहित व वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश वेले , पोलिस निरीक्षक मनोज चाळके यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि नाईक, सपोनि भुरे, मपोउनि शिंदे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार बहिरम, पाटील, पो. ना. मोरे ,भोगले, पोलीस शिपाई अहिरे,माडवे, सकट, तावे, जोगलपुरे,साळवी,वेदाते यांनी फक्त एका आरोपीचे अपूर्ण नावाचे आधारे महेंद्र लक्ष्मण जाधव (वय 42, रा विरार), निखिल शामकांत जाधव (वय 34, रा. विरार), स्वप्रील विलास पाटील (वय 34, रा.अंधेरी), तुषार रामदास टाकळकर (वय 30, रा मालवण), जीवनसिंग कुअर सिंह रावत (वय 31, रा. विरार), भूषण पुष्कराज मेळेकर (वय 32, रा. नालासोपारा) यांना सलग परिश्रमपूर्वक तांत्रिक तपासाच्या मदतीने 24 तासांच्या आत विरार येथील एका बियर बार मधुन अटक केली.

सदर आरोपीनी कुरार परिसरात आणखी काही ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पण्ण झाले असुन त्यावावत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here