सेल्फी काढताना विराणे धरणात बुडून दोघा भावंडांचा दुर्दैवी अंत

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – विराणे धरणाजवळ सेल्फी काढत असतांना लहान भाऊ तोल जावून पाण्यात पडल्याने त्यास वाचविण्यासाठी मोठ्या भावाने देखील धरणात उडी मारली मात्र दोघांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून अंत झाल्याची दुर्दैवी घटना आज तालुक्यातील विराणे धरणावर दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. दोघा तरूण भावंडांचा झालेल्या दुर्दैवी अंताचे घटनेने अजंग-वडेल गावात शोककळा पसरली आहे.

रितेश बाळू जाधव (19) व हर्षल बाळू जाधव (22, दोघे रा. अजंग) हे त्या मृत तरूणांची नावे आहेत. अजंग गावातील कन्नोर कुटूंबियांच्या लग्नानिमित्त वर्‍हाडासोबत रितेश व हर्षल हे दोघे भांवंडे देखील गेले होते. दुपारी लग्न सोहळा आटोपल्यानंतर गावालगत असलेल्या विराणे शिवारातील धरण पाहण्यासाठी रितेश व हर्षल हे दोघे गेले होते.

यावेळी सेल्फी काढण्याचा मोह झाल्याने ते मोबाईलने धरणाच्या काठालगत उभे राहून सेल्फी काढत असतांना रितेशचा तोल गेल्याने तो धरणाच्या पाण्यात पडला. लहान भाऊ पाण्यात पडल्याचे पाहताच त्याला वाचविण्यासाठी हर्षलने देखील धरणात उडी मारली. मात्र दोघा भावंडांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले. त्यांच्याबरोबर असलेल्या दोघा-तिघांनी हा प्रकार धावत येवून वर्‍हाडी मंडळींना सांगताच एकच खळबळ उडाली.

ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बुडालेल्या दोघा भावंडांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना तातडीने मालेगाव येथे वैद्यकिय उपचारासाठी हलविण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. या घटनेने अजंग गावात एकच शोककळा पसरली आहे. वडनेर-खाकुर्डी पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here