धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा शहरात तीन दिवस संचार बंदी

वर्धा (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरेशी) – कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वर्धा शहर आणि शहराला लागून असलेल्या परिसरात दि. २७ मार्च शनिवार रात्री ८ पासून मंगळवार दि. ३० मार्च सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आल्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत.

वर्धा शहर व जिल्ह्यातील सर्व ठिकाणी ही संचारबंदी लागू असून, २९ रोजी धुलिवंदन असल्याने हे निर्बंध लागू करण्यात आले आहे. २७ मार्च ते ३० मार्च असे तीन दिवस ही संचारबंदी राहणार असून, या दरम्यान सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील हॉटेल्स, रेस्टारंट, दुकाने, मॉल्स, मार्केट, कॉम्प्लेक्स बंद राहतील, तसेच नाश्ता सेंटर, पानटपरीदेखील बंद राहणार आहेत. तसेच शहरी व ग्रामीण भागातील ट्रॅव्हल्स, खासगी बसेस, एस.टी.बसेस, ऑटो रिक्षादेखील बंद राहतील. आपत्कालीन स्थितीत खासगी वाहन वा ऑटो रिक्षा वापरास मुभा आहे.

जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेली दुधसेवा, हॉटेलमधील होम डिलिव्हरी सेवा सकाळी ६ ते रात्री दहा दरम्यान सुरु ठेवता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकारची औषधी दुकाने, रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक, प्रयोगशाळा, पॅथॉलॉजी लॅब, रुग्णवाहिका, कोविडकरिता असलेल्या खासगी वैद्यकिय आस्थापना सुरु राहतील.

संचारबंदी काळात परिक्षा असल्यास याकरिता सार्वजनिक बससेवा व खासगी वाहनांना परवानगी राहिल मात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या परिक्षेचे प्रवेशपत्र सोबत ठेवणे आवश्यक राहील. एमआयडीसी अंतर्गत येणाऱ्या औद्योगिक आस्थापना त्यांच्या मजुरांसह सुरु राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here