पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध; ढाका विद्यापीठातील आंदोलनात २० जखमी

ढाक्का – बांगलादेश स्वातंत्र्यांचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि बंगबंधु शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहेत. ढाका विद्यापीठ परिसरात झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यामध्ये २० जण जखमी झाले आहेत.

या जखमींमध्ये दोन पत्रकार अणि सरकारचा पाठिंबा असलेल्या बांगलादेश छात्र लीगच्या (बीसीएल) दोन कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ढाका विद्यापीठ परिसरात गुरुवारी पंतप्रधान मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याविरोधात आंदोलन सुरू होते. हे आंदोलन विविध डाव्या-पुरोगामी विद्यार्थी संघटनांचा सहभाग असलेल्या ‘प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स अलायन्स’च्यावतीने करण्यात आले होते. त्यावेळी सरकारचा पाठिंबा असलेल्या विद्यार्थी संघटनांना या आंदोलकांवर हल्ला केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

‘प्रोग्रेसिव्ह स्टुडंट अलायन्स’च्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या विरोधात वीसी चत्तर भागात आंदोलन सुरू होते. सत्ताधारी पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या बांगलादेश छात्र लीगच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आंदोलकांवर हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या आंदोलकांवर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करण्यात येत आहे.

दरम्यान, गुरुवारीच मोतीझील भागात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याविरोधात ‘जुबो अधिकार परिषदे’च्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here