पश्चिम बंगालसह आसाममध्ये 77 मतदारसंघांत आज मतदान

पहिल्या टप्प्यात 264 उमेदवारांचे नशीब मतदारांच्या हाती

नवी दिल्ली – पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शनिवारी पश्चिम बंगाल आणि आसामच्या ७७ मतदारसंघांत मतदान होणार आहे. त्यात आसामच्या ४७ तर बंगालच्या ३० जागा आहेत. निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पहिल्या टप्प्यात एकूण २६४ उमेदवार असून त्यात २३ महिलांचा समावेश आहे. मतदान सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालेल.

आसाममध्ये पहिल्या टप्प्यात ज्या महत्त्वाच्या उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्राॅनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) बंद होणार आहे त्यात मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, राज्य विधानसभेचे अध्यक्ष हितेंद्रनाथ गोस्वामी आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रिपुन बोराह यांचा समावेश आहे. राज्यात एकूण १२६ मतदारसंघ असून तीन टप्प्यांत निवडणूक होत आहे.

दुसऱ्या टप्प्याचे मतदान एक एप्रिलला तर तिसऱ्या टप्प्याचे मतदान सहा एप्रिलला होईल. दुसरीकडे, २९४ मतदारसंघ असलेल्या बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी २१ महिलांसह १९१ उमेदवार आहेत. त्यात श्रीकांत महतो, राजीव लोचन सरेन, उत्तम बारीक (तृणमूल काँग्रेस), रवींद्रनाथ मैती, राजीव कुंडू, चंदन बौरी (भाजप), नेपाल महतो व शिव मैती (काँग्रेस) या उमेदवारांचा समावेश आहे. राज्यात ८ टप्प्यांत मतदान होणार आहे. सर्व राज्यांतील निकाल २ मे रोजी येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here