खरगोन (मध्यप्रदेश) – आंतरजातीय प्रेमसंबंधातून आजही काही वेळा जीवघेण्या घटना घडताना दिसतात. अशीच घटना मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात घडली आहे.
मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील खंगवाड गावात राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीचे आंतरजातीय मुलाशी प्रेमसंबंध होते. हे तिच्या कुटुंबियांना पसंत नव्हते म्हणून ते तिला विरोध करत होते.
16 मार्चला या मुलीच्या कुटुंबियांनी ज्या मुलासोबत तुझे प्रेमसंबंध आहेत त्याचा मोबाईल नंबर डिलिट कर असे सांगितले. पण ती ते ऐकण्यास तयार नव्हती. तिने नंबर डिलिट करण्यास नकार दिला. त्यामुळे चिडून तिच्या भावाने तिची गळा दाबून हत्या केली. काही वेळ तिचे प्रेत घरातच ठेवले होते.
त्यानंतर अंधार पडल्यावर कुटुंबियांनी तिचे प्रेत घरापासून दूर अंतरावर असलेल्या विहिरीत फेकून दिले. दुसऱ्याच दिवशी 17 मार्चला या मुलीच्या वडिलांनी आपली मुलगी हरवली आहे, अशी तक्रार पोलिसांत दाखल केली. तसेच त्यांनी पोलिसांकडे त्यांच्या मुलीला कोणीतरी पळवून नेल्याची शंकाही व्यक्त केली होती.
18 मार्च रोजी पोलिसांना या अल्पवयीन मुलीचे प्रेत तिच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत तरंगताना दिसले. तसेच पोलिसांनी या घटनेप्रकरणी तिचे आईवडील, भाऊ आणि दोन नातेवाईकांची सक्तीने चौकशी केली तेव्हा त्यांनी अल्पवयीन मुलीची हत्या केल्याचा गुन्हा मान्य केला. शिवाय आमच्या मुलीचे आंतरजातीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. हे आम्हाला मान्य नव्हते. तसेच तिला आम्ही मोबाईलमधून तिच्या प्रियकराचा मोबाईल नंबर डिलिट कर असे सांगितले होते, पण ती नंबर डिलिट करण्यास तयार नव्हती त्यामुळे तीव्र संतापाने तिची गळा दाबून हत्या केली असल्याचा गुन्हा तिच्या कुटुंबियांनी मान्य केला, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मानसिंह ठाकूर यांनी दिली आहे.
पोलिसांनी या मुलीचे प्रेत शवविच्छेदनाकरिता रुग्णालयात पाठवले. तेव्हा मिळालेल्या अहवालानुसार या अल्पवयीन मुलीची हत्या विहिरीत बुडून झाली नसून तिला गळा दाबून ठार करण्यात आले आहे, कारण तिचा गळा दाबल्याच्या खुणा तिच्या गळ्यावर आढळल्या. याप्रकरणी पोलिसांनी आईवडिल, भाऊ आणि दोन जवळच्या नातेवाईकांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी अद्याप तिच्या बॉयफ्रेंडची चौकशी केलेली नाही.






