अनूपपूर (छत्तीसगड) – प्रेमात पडलेली व्यक्ती कधी काय करेल, हे काही सांगता येत नाही. आपल्या गर्लफ्रेन्डला खूश करण्यासाठी एका युवकाने गंभीर गुन्हा केला आहे. त्याने गर्लफ्रेन्डला महागडं गिफ्ट देता यावं, यासाठी आपल्या जीवाभावाच्या मित्राचा दगडाने ठेचून खून केला आहे. त्यानंतर आरोपी युवकाने आपल्या मित्राकडील दागिने आणि इतर मुद्देमाल हडपून फरार झाला होता. चोरी केलेल्या पैशातून त्याने प्रेयसीला महागडं गिफ्ट दिलं मात्र त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. पोलिसांनी गुन्ह्याची कसून चौकशी केल्यानंतर आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
संबंधित घटना छत्तीसगडच्या भालूमाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आरोपी आसिफ खानने 1 फेब्रुवारी 2021 रोजी आपला मित्र राहुलकडून काही दागिने आणि मोबाइल लुटला. त्यानंतर त्याच्यावर दगडाने जोरदार हल्ला केला. त्यानंतर त्याला तिथेच टाकून पळ काढला. यानंतर काही लोकांनी जखमी राहुला पाहिलं आणि त्यांनी बिलासपूरच्या युनिटी रुग्णालयात दाखल केलं. उपचार सुरू असतानाच 21 मार्च रोजी राहुलचा मृत्यू झाला आहे.
राहुलच्या मृत्यूनंतर त्याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्लाचं गूढ कायम होतं. पण या घटनेचा तपास करत असताना, राहुलला सर्वात शेवटी त्याचा मित्र आसिफ खानसोबत पाहिलं गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आसिफला चौकशीसाठी बोलावलं. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आसिफने पोलिसांना सांगितलं की, आपल्या प्रियसीला महागडं गिफ्ट देऊन खूश करण्यासाठी त्याने मित्र राहुलची हत्या केली.
आरोपीने पुढे पोलिसांना सांगितलं की, काही दिवसांपूर्वी मृत राहुलचे त्याच्या पत्नीसोबत वाद झाला होता. त्याने राहुलने त्याच्या पत्नीकडून सारे दागिने घेतले होते. एके दिवशी दारुच्या नशेत राहुलने सर्व दागिने आपला मित्र आसिफ खानला दाखवले होते. त्यानंतर आरोपीने मंगळसुत्राच्या लालसेपोटी आपल्या मित्राची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने लुटलेला मुद्देमाल घेवून रायपूरला आपल्या प्रियसीला भेटायला गेला. प्रियसीला भेटून आल्यानंतर पोलीस चौकशीत आरोपी आसिफ खानचं पितळ उघड पडलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून याप्रकरणी पुढील कारवाई केली जात आहे.






