अकोला (प्रतिनिधी) – ‘फ्री फायर’ या ऑनलाइन गेमद्वारे फसवणूक होत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या गेमच्या माध्यमातून कर्जत येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. पोलिसांनी वेळीच कारवाई करत या मुलीशी चॅटिंग करणाऱया 24 वर्षीय तरुणाला विदर्भातील अकोला जिह्यातील बाळापूर येथून अटक केली आहे. दरम्यान, मुलांच्या हातात मोबाईल देताना पालकांनी सावधगिरी बाळगावी.
आपली मुले मोबाईलवर काय चॅटिंग करतात, यावर लक्ष देणे गरजेचे असल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे. कर्जत पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत या घटनेचा छडा लावल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. मिथून पुंडलिक दामोदर (वय 24, रा. सगद, ता. बाळापूर, जि. अकोला) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
कर्जत येथील अल्पवयीन मुलगी शनिवारी (दि. 20) बेपत्ता झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली. कर्जत परिसर आणि नातेवाईकांकडे तपास करून मुलगी सापडली नसल्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याची तत्काळ दखल घेत तपासासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथक तैनात करण्यात आले.
तपास सुरू असताना काही मुलं आणि मुली ऑनलाइन ‘फ्री फायर’ हा गेम खेळत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, अल्पवयीन मुलगी आणि फसवणूक करणारा मुलगा ऑनलाइन एकत्र हा गेम खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे मुलगी बाळापूर येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी रात्री बाळापूर येथे जाऊन मिथून दामोदर याला अटक करून त्याच्या घरातून मुलीचीही सुटका केली.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक भगवान शिरसाट, राशीन पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस अंमलदार तुळसीदास सातपुते, गणेश ठोंबरे, मोबाईल सेलचे नितीन शिंदे, मारुती काळे, सागर म्हेत्रे, बळीराम काकडे, गणेश भागडे, संपत शिंदे यांनी ही कारवाई केली.
मुलगी मिथून याच्या घरी असल्याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी त्याला फोन केला. त्यावेळी माझे लग्न जमले असून, साखरपुडाही झाला आहे, असे त्याने सांगितले. यावेळी त्याने दुसऱया मुलीसोबत तयार केलेला बनावट फोटो मुलीच्या नातेवाईकांना पाठवून दिला होता.






