नाशिक (विशेष प्रतिनिधी) – वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेता प्रशासनाने धुलीवंदन तसेच नाशिकमधील वीर मिरवणुकांवर अनेक निर्बंध घातले आहेत. त्यानुसार वीर मिरवणूका, भाविक आणि वाहनांना गोदाघाट व रामकुंड परिसरात प्रवेश नाकारण्यात येणार आहे. तसेच रहाड परिसरात देखील संचारबंदीचे आदेश असतील.सहायक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांनी याबाबत आदेश काढले असून सोमवारी (दि. 29) आणि शुक्रवारी (दि. 2 एप्रिल) रोजी हे निर्बंध लागू असतील.
हिंदू धर्मातील महत्वाचे उत्सव म्हणून धुलिवंदन, वीर मिरवणूक आणि रंगपंचमी साजरी केली जाते. या उत्सवानिमित्त पंचवटी, रामकुंड व गोदाघाट परिसरात भाविकांची मोठी मांदीयाळी जमते. यंदा मात्र या सणांवर कोरोनाचे सावट असून कोरोनाच्या वाढत्या फैलावास आवर घालण्यासाठी प्रशासनाने अनेक निर्बंध घातली असून त्यात दररोज वाढ होत आहे. विकेंडला लॉकडाऊन, सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना बंदी घातल्यानंतर आता धुलिवंदन, वीर मिरवणूका आणि रंगपंचमीवर देखील मर्यादा घालण्याल्याने उत्सवावर विजरण पडले आहे.
सोमवारी धुलिवंदन आणि वीर मिरवणूक असल्याने कोरोनाचा धोका लक्षात घेता या ठिकाणी होणाऱ्या भव्य गर्दीचा विचार करता हे निर्बंध घालण्यात आले आहे. तसेच वीर मिरवणूकीकरिता भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतून मोदकेश्वर गणपतीकडून व गाडगे महाराज पुलाकडून गोदाघाटकडे येणारे मार्ग आणि सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतून भांडीबाजाराकडून रामसेतू पुलाकडून येणारे मार्ग, मालेगाव स्टॅड, सरदार चौक, शनि चौक, गणेशवाडी, अमरधामकडून येणाऱ्या मिरवणूका, भाविक व वाहनांना रामकुंड व गोदाघाट परिसरात प्रवेश देण्यात येणार नाही.
या काळात परिसरात खासगी वाहने, मिरवणूकीच्या वाहनास प्रवेश नाकारण्यात येणार आहे. केवळ शासकीय वाहने, रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेच्या वाहनांच सुट असेल. याशिवाय अत्यविधीकरिता 20 व्यक्तींना कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करून सहभागी होता येईल. सर्व प्रकारचे मेळावे, सामाजिक-राजकीय कार्यक्रम, पुजेची दुकाने, यात्रा, जत्रा, मनोरंजन कार्यक्रम, आठवडे बाजार व सर्व आस्थापना बंद असतील असे आदेशात म्हटले आहे.






