अडीच कोटीच्या 16 गाड्या पोलिसांनी केल्या जप्त

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – अहमदनगर येथे टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनींकडून वाहने भाड्याने चालविण्यासाठी घेत ती वाहने परस्पर गहाण ठेवत फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 2,69,00,000 रुपये किमतीच्या 16 अलिशान कार जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली. दरम्यान अन्य गाड्यांचा शोध सुद्धा लावणार असून यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. या प्रकरणामध्ये सध्या एकच आरोपी असून त्या आरोपीचे नाव दादा उर्फ शशिकांत मारुती सातपूते (रा. भोयरे गांगरडा, ता. पारनेर) असे आहे. यात त्याचे अन्य कोणी साथीदार आहेत काय, याचा शोध पोलीस घेत आहेत.

या बाबतची माहिती अशी की, तक्रारदार महेश प्रताप खोबरे ( वय 40, रा.पिसोळ, जि- पुणे) यांचा टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. आरोपीने तक्रारदारांकडून मार्च 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये इनोव्हा क्रिस्टा, इटीगा, झेस्ट अशा एकूण 22 कार महाबली एन्टरप्रायजेस या नावाने भाड्याने चालविण्यासाठी घेतल्या होत्या. त्यापैकी 9 कार आरोपीने तक्रारदारांना परत केल्या. मात्र, उर्वरित 13 कारचे भाडे व त्या कार तक्रारदारांना परत केल्या नाहीत. तसेच कारबाबत काहीही माहिती तक्रारदरांना दिली नाही. त्यामुळे त्यांनी सुपा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी शशिकांत सातपूते याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्ह्याचा तपास अनील कटके (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा) यांच्याकडे हस्तांतरीत करत तपासाबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्याचा तपास सुरु केला. तपासामध्ये आरोपी दादा उर्फ शशिकांत मारुती सातपूते ( वय 26, रा. भोवरे गांगर्डा, ता. पारनेर) याचा शोध घेत त्याला अटक करुन त्याची पारनेर न्यायालयाकडून वेळोवेळी पोलीस कोठडी घेण्यात आली.

पोलीस कोठडीदरम्यान आरोपीकडून एकूण 16 अलीशान कार जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई . मनोज पाटिल, पोलीस अधीक्षक, , अधीक्षक तसेच अतिरिक्त पोलुस अधीक्षक सौरभ कूमार अग्रवाल , उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असल्याचेही पोलीस निरीक्षक कटके यांनी सांगितले.

आरोपीच्या ताब्यातून अन्य ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या गाड्या हस्तगत झाल्या आहेत. त्याने अनेक जणांकडून कार घेऊन तुम्हाला यातून दर महिन्याला जास्तीचे पैसे मिळवून देतो असे त्यांने सांगितले तसेच काही करारनामे सुद्धा त्यांनी करून घेतले होते.अनेक महिने उलटून गेले तरीही मूळ मालकांना तो पैसे देत नव्हता व गाड्याही परत करीत नव्हता व त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे उजेडात आले व त्यानंतर हा प्रकार पोलिसांनी उजेडात आणल्यावर याचे मोठे रॅकेट असल्याचे लक्षात आले. दर महिन्याला 30-40 हजाराचे भाडे देण्याचे आमिष दाखवून त्याने या घेतलेल्या गाड्या तो नंतर गहाण ठेवून पैसे कमवायचा, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलीस आता त्याच्यासमवेत आणखी कोणी होते का, तसेच या गाड्यांपैकी एक गाडी खंडणीच्या गुन्ह्यात वापरली असून, एमआयडीसी पोलिसांनी त्या गुन्हयात ती जप्त केली आहे, त्यामुळे अन्य हस्तगत करण्यात आलेल्यापैकी गाड्या अन्य कोणत्या गुन्ह्यात वापरल्या काय, याचा तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here