भिंड (मध्यप्रदेश) – तिसरं लग्न करण्यासाठी आपल्याच नणंदेच्या नवऱ्यासोबत एक महिला फरार झाल्याचं वृत्त आहे. फरार होण्यापूर्वी तिने आपल्या सासरच्या 9 लोकांना खाण्यातून विष दिलं आहे.
ही घटना मध्य प्रदेशातील भिंड या जिल्ह्यात घडली आहे. रेशमा असं या महिलेचं नाव आहे. रेशमाचं पहिलं लग्न मुंशीखान नावाच्या माणसाच्या मुलाशी झालं होतं. पण, त्याचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर तिच्या दीराने तिच्याशी दुसरा विवाह केला.
पण, या दरम्यान रेशमा हिचे सूत तिच्या नणंदेचा नवरा लोहकन खान याच्याशी जुळले. त्यांच्या या प्रेमाला त्यांच्या घरच्यांचा विरोध होता. पण, रेशमाला लोहकनसोबत तिसरं लग्न करायचं होतं. त्यामुळे तिने एक भयंकर योजना बनवली.
तिने आपल्या सासरच्या नऊ माणसांच्या जेवणात विष मिसळलं. त्यानंतर रेशमा आणि लोहकन तिथून फरार झाले. बराच वेळ मुंशीखान यांच्या घरातून हालचाल न दिसल्याने शेजाऱ्यांनी त्यांच्या घरात डोकावून पाहिलं. तेव्हा सगळे कुटुंबीय बेशुद्ध झाल्याचं त्यांना आढळलं. त्यांनी त्वरित त्यांना रुग्णालयात दाखल केलं.
रेशमा आणि लोहकन दोघंही फरार सध्या फरार असून पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत. तर त्यांच्या कुटुंबीयांना पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.






