अहमदाबाद (गुजराथ) – नवरा दारू पिण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याची तक्रार एका 34 वर्षीय महिलेने अहमदाबाद येथील अदालज पोलीस ठाण्यात केली आहे.
या महिलेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 2016 साली तिचे सानंद या तिच्या मूळ गावी लग्न झाले. लग्नानंतर नवरा नोकरीनिमित्त दुबईला राहात असल्याने तिलाही दुबई येथेच स्थायिक व्हावे लागले. त्यांना दोन वर्षाची मुलगी आहे. काही वर्षांनी तो तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करू लागला. तसेच तो तिला आणि तिच्या दोन वर्षाच्या मुलीला मांसाहार करण्याची आणि बियर पिण्याची जबरदस्ती करू लागला.
तसेच तू आधुनिक पद्धतीने राहात नसल्याने मला आवडत नाहीस असे टोमणेही मारू लागला. तो सतत तिला व्हिडियो कॉल करून त्रास देत असे. दररोज मद्यधुंद अवस्थेत घरी आल्यावर तिला मारझोड करत असे. मुलीला बियरची बाटली खेळायला देतो, अशी तक्रार या महिलेने तिच्या नवऱ्याबाबत पोलिसांकडे केली आहे.
नवऱ्याची सततची मारझोड, शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून ही महिला सध्या मुलीसह तिच्या आई-वडिलांच्या घरी राहायला आली आहे. अदालज पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करत आहेत.






