मोसंबीच्या शेतात बकऱ्या गेल्याच्या कारणावरून एकाचा खून

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – मोसंबीच्या शेतात बकऱ्या घुसल्याच्या कारणावरून लोखंडी रॉड व दगडाने केलेल्या हल्ल्यात एका 35 वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना अटक केलेली आहे.

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील काजळा शिवारात ही घटना घडली. तालुक्यातील बुटेगाव येथील संजय पुंजाराम मांगडे (35), संदीप सुदाम गवारे व सोमनाथ तुकाराम जाधव हे 29 मार्च 2021 रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास बकऱ्या चारत असताना त्यांच्या बकऱ्या बाजूलाच असलेल्या काजळा शिवारातील विठ्ठल अप्पा गरड यांच्या मोसंबीच्या शेतात गेल्या.

मोसंबीच्या शेतात बकऱ्या घुसल्याचा राग आल्याने विठ्ठल गरड व बद्री उर्फ मन्नू विठ्ठल गरज या दोघांनी संदीप व सोमनाथ यांना शिवीगाळ करत लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बद्री उर्फ मन्नू गरड याने संजय पुंजाराम मांगडे याच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार फटका दिल्याने तो कोसळला असता त्याच्या छातीत मोठा दगड मारला. त्यामुळे त्याला रक्ताची उलटी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे, सहपोलीस उपनिरीक्षक निवृत्ती शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.

या बाबत मृताचा भाऊ रमेश पुंजाराम मांगडे याच्या तक्रारीवरून विठठल गरड व बद्री उर्फ मन्नू गरड या दोघांविरूध्द कलम 302, 324, 504, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना रक्ताने माखलेल्या कपड्यासह ताब्यात घेतलेले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here