मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – देशभरात धावत्या ट्रेनमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने विशेष अभियान राबवले आहे. गेल्या दहा दिवसात रेल्वे आणि रेल्वे स्टेशन परिसरात धूम्रपान करणाऱ्या आणि ज्वालाग्राही वस्तू वापरणाऱ्यांवर कारवाई करत 20 हजार रुपयांहून अधिकचा दंड वसूल केला. धुम्रपानाविरोधातील ही कारवाई सतत सुरू राहील असे कोकण रेल्वेने जाहीर केले आहे.
देशात गेल्या काही दिवसात ट्रेन मध्ये आग लागण्याच्या घटना विविध ठिकाणी घडल्या आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रवाश्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी कोकण रेल्वेने एक विशेष अभियान हाती घेतले आहे. गेल्या दहा दिवसांत कोकण रेल्वेने रेल्वेतून ज्वालाग्राही पदार्थ घेऊन जाणाऱ्या मंडळी सह रेल्वे आणि स्थानक परिसरात धूम्रपान करणाऱ्या मंडळी विरोधात धडक मोहीम राबवली आहे.कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांची या अंतर्गत तपासणी करण्यात आली आहे.
कोकण रेल्वेने केवळ प्रवाश्यांचीच तपासणी केली नाहीतर रेल्वेच्या भोजन कक्षापासून विविध ठिकाणी आगीस कारण ठरणाऱ्या गोष्टीची असणार नाहीत याची कसून तपासणी केली आहे. कोकण रेल्वेतून होणारा प्रवास हा पूर्णतः सुरक्षित असावा यासाठी हि मोहीम राबवली गेली आहे.
अनेक वेळा रेल्वेतून प्रवास करणारी मंडळी धूम्रपान करून पेटती सिगारेट-काडेपेटी बाहेर फेकून देतात.यातून मार्गानजीक आग लागण्याची शक्यता असते.या साठी कोकण रेल्वेच्या विविध स्थानकांवर या संबंधातील घोषणा वारंवार केल्या जात आहेत.
गेले दहा दिवस चाललेल्या या अभियानात कोकण रेल्वेचे विविध स्तरातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. या पुढील काळात ही सुरक्षिततेच्या या उपाययोजना सुरू रहातील याकरीता नियोजन केल्या आहेत. कोकण रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांमध्ये यापुढेही प्रवाश्यांची तपासणी सुरू राहील असा कोकण रेल्वेने सांगितले आहे.






