भाजपा पदाधिकाऱ्याने घेतलेल्या बोगस ओबीसी प्रमाणपत्राची चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

पणजी (प्रतिनिधी निलेश म्हापसे) – उत्तर गोवा भाजपा समितीचे उपाध्यक्ष फ्रँकी कारवाल्हो यांनी फेरफार करत आणि सत्तेचा गारवापर करून बोगस ओबीसी प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे उपाध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी मंगळवारी केला. तसेच या बोगस प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

भाजप अध्यक्ष सदानंद शेट तनावडे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि हळदोणच्या आमदारांनी या प्रकाराचे स्पष्टीकरण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. अमरनाथ पणजीकर यांनी कॉंग्रेस हाऊस पणजी येथे पत्रकार परिषद घेत बोगस प्रमाणपत्राचा प्रकार उघड केला. यावेळी गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक उपस्थित होत्या.

अमरनाथ पणजीकर म्हणाले की, भाजप सत्तेत राहण्यासाठी कुठल्याही पातळीवर जाऊ शकतो, हे ह्या प्रमाणपत्राच्या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे. फ्रँकी कारवाल्हो इतर मागासवर्गीय वर्गाचे नाही. आपण ख्रिश्चन खार्वी समाजाचे असल्याचा दावा करत त्यांनी पारंपरिक मच्छीमार संघटनेकडून प्रमाणपत्र घेतले. या संघटनेची दिशाभूल करत आणि भाजपमधील त्यांचे स्थान वापरुन त्यांनी हे प्राप्त केले आहे. हा गुन्हा आहे आणि म्हणूनच या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

पणजीकर म्हणाले की, भाजपाचे कार्यकर्ते अशा प्रकारच्या हेरफेरमध्ये गुंतलेले आहेत. आता म्हापसा पालिका निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने कारवाल्हो एका दिवसात ख्रिश्चन खार्वी समाजाचे सदस्य बनले आणि पुढील प्रक्रिया करण्यासाठी ओबीसी प्रमाणपत्र घेतले. आरक्षणाची घोषणा होताच त्यांनी हा प्रकार केल्याने त्यांचा हेतू स्पष्ट झाला आहे, असे पणजीकर म्हणाले. भाजपचे नेते बोगस प्रमाणपत्रे घेत लोकप्रतिनिधी व्हायला बघत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

पारंपरिक मच्छीमार असोसिएशनने, त्यांची दिशाभूल झाल्याचे कळल्यावर कार्वाल्हो यांना दिलेले प्रमाणपत्र रद्द केले असल्याची माहिती पणजीकर यांनी दिली. मात्र, सत्तेचा गैरवापर करत कारवाल्हो पुन्हा असे प्रमाणपत्र घेण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. या असोसिएशनचे अधिकारी पीटर मेनन यांनी यापूर्वी इतर व्यक्तींना अशी प्रमाणपत्रे दिली होती की नाही याची चौकशी केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here