पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – मेट्रोच्या मार्गिकेचे खोदकाम सुरू असताना बाणेर रस्त्यावर आयसर संस्थेजवळ ग्रेनेड आढळून आले आहेत. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर चतुःशृंगी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह बॉम्ब शोधक व नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
त्यावेळी ते ग्रेनेड निकामी असल्याचे दिसून आले. आढळून आलेले ग्रेनेड मेट्रो अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी दिली.
बाणेर रस्त्यावर मेट्रोच्या मार्गिकेचे खोदकाम सुरू आहे. खोदकाम सुरू असताना आज कर्मचाऱ्यांना ग्रेनेड सदृश्य वस्तू दिसून आली. त्यांनी पाहणी केली असता, ते ग्रेनेड असल्याचे निदर्शनास आले.
त्यानुसार पोलीस व बॉम्बशोधक व नाशक पथकांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यावेळी मिळून आलेले ग्रेनेड निकामी असल्याचे निष्पन्न झाले. यासंदर्भात सैन्य विभागाशी संपर्क करण्यात आला आहे. त्यांच्या सूचनेनुसार ग्रेनेड नष्ट करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.






