वाराणसी (उत्तर प्रदेश) – उत्तरप्रदेशची धार्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाराणसीत होळी या आनंदाच्या, उत्साहाच्या सणाला गालबोट लागलं आहे. एका टोळक्याने भाजप कार्यकर्त्याची हत्या केली. कारण अगदी साधे होते. या टोळक्याने या कार्यकर्त्याच्या पत्नीच्या गालाला रंग लावण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांनी त्याला मरेपर्यंत मारहाण केली. या मारहाणीदरम्यान त्याला वाचविण्यास आलेले चार जण जखमी झाले असून, रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाराणसीतील चौबेपूर परिसरातील बराई गावात ही घटना घडली. गावात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत होता. येथील राजू राजभर (वय ३५) याच्या पत्नीला काही जण जबरदस्ती रंग लावत होते. ते पाहून राजू भडकला. त्याने रंग लावणाऱ्यांना विरोध केला. राजू आणि विरोधी गटात बाचाबाची झाली. काही वेळात वातावरण निवळलं. दोन्ही गट आपापल्या घरी गेले. काही वेळानंतर जवळपास २० ते २५ जण आले. राजूच्या घराबाहेर उभे राहून शिवीगाळ करू लागले. राजू बाहेर आल्यानंतर त्याने विरोध दर्शवला. त्यावर राजू आणि त्याच्या कुटुंबीयांना गटाकडून मारहाण करण्यात आली. त्यांनी लाठ्याकाठ्यांनी राजूला बेदम मारहाण केली. त्याला वाचवण्यासाठी कुटुंबीयही धावले. त्यांनाही मारहाण केली.
राजूला मारहाण सुरू असताना, त्याची लहान मुले जोरजोरात ओरडत होती. मात्र, कुणीही पुढे आले नाही. राजूच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता. त्याला त्याच अवस्थेत साडून आरोपी पसार झाले. लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राजूला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, राजू गावातील बीडीसी सदस्य आणि भाजपचा कार्यकर्ता होता. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांना अद्याप अटक झालेली नाही.






