नागपूर (कार्यालय प्रतिनिधी) – कारवाईसाठी गेलेल्या महिला पोलिसावर अवैध दारू विक्रेत्यांनी हल्ला करून तिचा विनयभंग केला. ही खळबळजनक घटना खापरखेड्यातील पिपळा डाक बंगला भागात सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. विक्की देविदास चंद्रिकापुरे (वय ३२), त्याची पत्नी स्वाती विक्की चंद्रिकापुरे (वय २७) व गौतम चंद्रिकापुरे (वय २८, सर्व रा. कुचक मोहल्ला, पिपळा डाक बंगला), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी विक्की व गौतम या दोघांना अटक केली.
विक्की चंद्रिकापुरे हा अवैध दारू विक्री करीत असल्याची माहिती खापरखेडा पोलिसांना मिळाली. खापरखेडा पोलिस स्टेशनच्या महिला कर्मचारी व त्यांचे पथक तेथे गेले. तिघांनी महिला कर्मचाऱ्याला पकडले. शिवीगाळ करून तिच्यावर हल्ला केला. गौतम व विक्कीने महिला पोलिसाचा विनयभंग केला. घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. या घटनेने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.






