नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – उलवे परिसरात राहणाऱ्या पोटच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाला एनआरआय पोलिसांनी गजाआड केले आहे. संबधित व्यक्तीची मुलगी अत्याचाराला कंटाळून घर सोडून निघून गेल्यावर या घटनेचा उलगडा झाला.
उलवे येथे राहणाऱ्या संबंधित व्यक्तीची 13 वर्षीय मुलगी वडील करीत असलेल्या कृत्यामुळे घरातून पळून गेली होती. या प्रकरणी संबधित व्यक्तीने मुलगी हरवली असल्याची तक्रार एनआरआय पोलीस ठाण्यात शनिवारी दाखल केली होती.मुलगी हरवल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीची मुलगी पोलिसांना नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात सापडली. पोलिसांनी पळून जाण्याचे कारण विचारल्यानंतर त्यातून धक्कादायक खुलासा समोर आला.
13 वर्षीय मुलगी व तिची 14 वर्षीय मोठी बहीण या दोन्ही मुलींवर त्यांचे वडील लैंगिक अत्याचार करत असल्याची मुलींनी पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी संबंधित बापाला एनआरआय पोलिसांनी अटक केले असून, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.






