इस्लामाबाद – जगभरात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पाकिस्तानमध्ये देखील कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वीच चीनची कोरोनाची लस टोचून घेतली होती. त्यानंतरही आता त्यांना कोरोनाची लागण झाली. याच दरम्यान आता एक अजब घटना समोर आली आहे.
पाकिस्तानमधील फालिया शहरातून जवळपास 20 जणांना कोरोना संसर्ग टाळण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पकडण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांना एकाच तुरुंगात डांबण्यात आलं. विशेष म्हणजे सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन न केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. लोकांन जेलमध्ये डांबून ठेवल्याचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पाकिस्तानी पोलिसांनी केलेल्या या कारवाईची अनेकांनी खिल्ली उडवली आहे. सोशल डिस्टंसिंगचा नियम तोडला या आरोपाखाली सर्वांना अटक करण्यात आली पण सर्व आरोपींना एकाच जेलमध्ये डांबून पोलीस कशाप्रकारे नियम पाळत आहेत असा सवाल लोकांनी विचारला आहे.
Around 20 people arrested in Phalia city for flouting coronavirus SOPs. Next they are packed in one cell, hugging corona.. pic.twitter.com/trBVrH5R9J
— Naila Inayat (@nailainayat) March 30, 2021
पाकिस्तानी पत्रकार नायला इनायतने याबाबत एक ट्विट केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने 12 देशांमधील प्रवाशांना एक महिन्यांसाठी प्रवेश बंदी जाहीर केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पाकिस्तानने हा निर्णय घेण्यात आला आहे.






