रोहिंग्या मुस्लिमांना पुन्हा म्यानमारला धाडण्याची प्रक्रिया सुरू

जम्मू – जम्मू काश्मीरमध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला कारवाई करत १५० हून अधिक रोहिंग्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. भारतात अवैध पद्धतीनं दाखल झालेल्या या रोहिंग्या मुस्लिमांना पुन्हा म्यानमारला धाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय, अशी माहिती एका सरकारी प्रवक्त्यानं दिलीय. ताब्यात घेण्यात आलेल्या या रोहिंग्यांना कठुआ जिल्ह्याच्या ‘एका विशेष केंद्रा’त ठेवण्यात आलं आहे. इथे त्यांना आवश्यक त्या सुविधा प्रदान केल्या जात असल्याचंही सरकारी प्रवक्त्यांनी म्हटलंय.

जम्मूचे विभागीय आयुक्त राघव लांगर यांनी बुधवारी हिरानगर भागातील या विशेष केंद्राला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. मानवीय दृष्टीकोनातून या केंद्रात पिण्याचं शुद्ध पाणी, जनरेटरसह वीज, योग्य स्वच्छता, ड्रेनेज सिस्ट, झोपण्याची सुविधा आणि प्रकाश व्यवस्था यांसारख्या आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असल्याचंही सरकारी प्रवक्त्यांनी म्हटलंय. ६ मार्च रोजी शहरात पडताळणी मोहिमेदरम्यान अवैध पद्धतीनं भारतात दाखल झालेल्या जवळपास १६८ रोहिंग्यांना ताब्यात घेऊन या केंद्रात धाडण्यात आलं होतं.

रोहिंग्या मुस्लीम हे म्यानमानरचे बंगाली भाषिक मुस्लीम अल्पसंख्यांक आहेत. आपल्या देशात उफाळलेल्या धार्मिक हिंसाचारानंतर हे लोक अवैध पद्धतीनं भारतात दाखल झाले होते. अधिकतर रोहिंग्या मुस्लीमांनी बांगलादेशात शरण पत्करलीय. एका सरकारी आकड्यानुसार, जम्मू काश्मीरच्या जम्मू आणि सांबा जिल्ह्यात रोहिंग्या मुस्लीम आणि बांगलादेशींसहीत १३,७०० हून अधिक परदेशी नागरिक अवैध पद्धतीनं राहत आहेत. या संख्येत २००८ ते २०१५ दरम्यान ६००० हून अधिक वाढ झाल्याचंही सांगण्यात येतंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here