औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – पाणी तापवण्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला, यातून चिडलेल्या पतीने धारदार कोयत्याने सासू व पत्नीवर सपासप वार केले. यामध्ये सासू जागीच ठार झाली. तर पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर औरंगाबाद येथे घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना 2 एप्रिल रोजी बाबुलतारा (ता.परतुर) येथे रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान, पती संतोष महादेव सरोदे यास परतुर ठाण्याचे फौजदार राजेंद्र ठाकरे व त्यांच्या पथकाने पाठलाग करून, जालना-मंठा रोडवरील रामनगरजवळ पकडले. मयत सासूचे नाव रेशम कोळे (60) असे आहे. परतुर तालुक्यातील बाबुलतारा येथे रेशम कोळे हिची मुलगी कविता हिचा काही वर्षांपूर्वी रामनगर (ता.जालना) येथील संतोष महादेव सरोदे याच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर संतोष सरोदे व त्याची पत्नी कविता हे दोघेही बाबुलतारा येथे वास्तव्यास आहे. त्यांना 3 मुली 1 मुलगा अशी अपत्ये आहेत.
संतोष महादेव सरोदे हे रामनगर जवळील यशवंती ढाब्यावर वेटरचे काम करत असत. 2 एप्रिल रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास पाणी तापवण्याच्या क्षुल्लक कारणावरून चिडलेल्या संतोष सरोदे यांनी सासु रेशम कोळे व पत्नी कविता यांच्यावर सपासप कोयत्याने वार केले. यामध्ये रेशम कोळे या जागीच ठार झाल्या. तर पत्नी कविता सरोदे यांच्यावर औरंगाबाद घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत जखमी कविता सरोदे हिच्या फिर्यादीवरून परतुर पोलीस ठाण्यात पती संतोष महादेव सरोदे याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. तपास फौजदार राजेंद्र ठाकरे करीत आहे.






