पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – भरधाव वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे मोटार पाणलोट क्षेत्रात कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील तीन मुलींसह त्यांच्या आईचा मृत्यू झाला आहे. मुलींच्या वडिलांना पोहता येत असल्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. संबंधित कुटूंबीय तोरणागड पायथ्यालगत असलेल्या विहीर गावातील आहेत. हा अपघात शुक्रवारी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास पानशेतजवळील कुरण खुर्द गावच्या हद्दीतील खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात घडला आहे.
अल्पना विठ्ठल भीकुले (वय 45), मुलगी प्राजक्ता भीकुले ( वय 21), प्रणिता भीकुले (वय 17), वैदेही भीकुले (वय 8, सर्व रा. वीर, सध्या रा. धनकवडी पुणे) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. विठ्ठल केशव भिकुले (वय 46) पाण्यातून बाहेर आल्यामुळे वाचले आहेत. भीकुले कुटूंबीय शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विहीर गावातून कादवे घाट रस्ता मार्ग पानशेत रस्त्याने पुण्याकडे जात होते.
खडकवासला धरण पाणलोट क्षेत्राजवळील माऊलाई मंदिराजवळील पाणलोट क्षेत्रात अचानक मोटार पाण्यात कोसळली. घटनेची माहिती मिळताच पानशेत चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाण्यातील मोटारीचे दरवाजे तोडून तीन मुलींना बाहेर काढले. मात्र, पाण्यात बुडाल्यामुळे तिन्ही मुलींचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. मुलींसोबत मोटारीत बसलेली त्यांची आई बेपत्ता झाली होती. काही वेळानंतर त्यांचाही मृतदेह मिळून आला. पाण्यात मोटार कोसळून एकाच कुटूंबातील चौघींचा मृत्यू झाल्यामुळे विहीर गावावर शोककळा पसरली आहे. पाण्यात बुडालेल्या कुटूंबीयांना वाचविण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाने प्रयत्न केले.






