मंगळुर (कर्नाटक) – कर्नाटकमध्ये एक मुस्लिम तरुण हिंदू तरुणीसोबत बस मधून प्रवास करत होता. तेव्हा विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यानी तरुणाला चाकूने भोसकले आहे. यात तरुण जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकच्या मंगळूर शहरात एक तरुण आणि तरुणी बसमधून प्रवास करत होते. तरुण मुस्लिम धर्मीय तर तरुणी हिंदू होती. तेव्हा विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी दोघांना हटकले. तसेच दोघांना बसमधून बाहेर काढले. विहिंपच्या कार्यकर्त्यांनी तरुणाला मारहाण केली. जेव्हा तरुणीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिलाही दुखापत झाली. परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला चाकूने भोसकले आणि तिथून पळ काढला.
तरुणाला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. तरुण आणि तरुणी वेगवेगळ्या धर्माचे असल्याने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. तसेच या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. तसेच हा लव जिहादचा प्रकार असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला होता असेही म्हटले जाते.






