नाशिक महापालिकेचा लाचखोर कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – महापालिकेच्या घरपट्टी-पाणीपट्टी विभागातील कनिष्ठ लिपिकाला १० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले.

संजय वनारसीभाई पटेल (४५) असे या संशयित लाचखोराचे नाव आहे. फ्लॅटच्या नळ कनेक्शन देण्याच्या बदल्यात त्याने तक्रारदार महिलेकडे ३५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी ६ हजार रुपये त्याने त्वरित स्वीकारले होते. उर्वरित रकमेपैकी १० हजार रुपये शुक्रवारी (दि. २) उदय प्लाझा येथील पहिल्या मजल्यावरील रुममध्ये स्वीकारले.

यावेळी ‘एसीबी’च्या पथकाने आधीच सापळा रचलेला असल्याने पंच आणि साक्षीदारांसमक्ष संजय पटेलला अटक करण्यात आली. ‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली अपर अधीक्षक नीलेश सोनवणे, उपअधीक्षक विजय जाधव, सापळा अधिकारी निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, सहअधिकारी उपअधीक्षक नरेंद्र पवार, हवालदार सचिन गोसावी, पोलिस नाईक प्रकाश डोंगरे, अजय गरुड, प्रणय इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here