मीडियाशी संपर्क करुन कोब्रा टीमचा बेपत्ता जवान ताब्यात असल्याचा माओवाद्यांचा दावा

रायपूर (छत्तीसगड) – येथील बीजापूर भागात माओवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलाचा एक जवान बेपत्ता होता. हा बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचा दावा माओवाद्यांनी मीडियाच्या माध्यमातून केलाय. माओवाद्यांनी काही स्थानिक मीडिया कर्मचाऱ्यांना फोन करून जवानाच्या सुटकेसाठी एक अट समोर ठेवली आहे. आपण जवानाला कोणत्याही प्रकारे हानी पोहचवणार नसल्याचं आश्वासनही माओवाद्यांनी यावेळी दिलंय.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनचा एक जवान बेपत्ता आहे. या बेपत्ता जवानाचं नाव राजेश्वर सिंह मनहास असं आहे. राजेश्वर हे जम्मू काश्मीरचे रहिवासी आहेत.

माओवाद्यांनी स्थानिक पत्रकारांना फोन करून राजेश्वर यांना सोडण्यासाठी आपण तयार असल्याचं म्हटलंय. परंतु, सुटकेनंतर ते सुरक्षा दलात कार्यरत राहणार नाहीत तसंच ही नोकरी सोडून ते इतर दुसरं कोणतंही काम करतील, ही अट त्यांनी मान्य करण्याची अट माओवाद्यांनी समोर ठेवलीय.

दुसरीकडे, राजेश्वर सिंह यांच्या कुटुंबीयांनी छत्तीसगड सरकारकडे आपल्या पतीच्या सुखरुप सुटकेची मागणी केलीय. नक्षलवाद्यांची जी मागणी असेल ती पूर्ण करून आपल्या पतीची सुटका करण्यात यावी, असं राजेश्वर यांच्या पत्नीनं म्हटलंय. राजेश्वर यांच्या पिताही सीआरपीएफमध्ये तैनात असताना देशासाठी शहीद झाले होते. राजेश्वर यांच्या कुटुंबात त्यांची आई, पत्नी आणि एक लहानगी मुलगी यांचा समावेश आहे. राजेश्वर यांची त्यांच्या कुटुंबाशी शेवटचं संभाषण शुक्रवारी रात्री ९.०० वाजता झालं होतं. त्यावेळी त्यांनी आपण ऑपरेशनवर जात असल्याचं म्हटलं होतं. परंतु, त्यानंतर त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here