मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – करोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाल्याने सर्वांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. करोनाच्या या वाढत्या फैलावामुळे केंद्र तसेच राज्य सरकारने काही कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत. याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला असून मनोरंजन विश्वही याला अपवाद नाही. ही चिंता असतानाच आता मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनाही करोनाची लागण झाली आहे. यामध्ये आता अभिनेता- दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव याचाही समावेश झाला आहे.
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवला करोनाची लागण झाली आहे. प्रियदर्शनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
प्रियदर्शन जाधवने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो म्हणतो की, ‘मी सर्वांना कळवू इच्छितो की सर्व नियम पाळूनही माझी करोना चाचणी पॉझिविव्ह आली आहे. योग्य उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना आपली करोना चाचणी करावी ही विनंती , काळजी घ्या. ‘ असे सांगत प्रियदर्शनने सगळ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. प्रियदर्शनच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.






