चहा करण्यास नकार दिल्याने पतीने दिला तलाक

गाझियाबाद (उत्तर प्रदेश) – येथील लोनी येथे एक तिहेरी तलाकचा प्रकार समोर आला आहे. पत्नीने चहा तयार करून दिला नाही म्हणून पतीने तिला तलाक दिला. पीडितेने वकिलांमार्फत कोर्टात अर्ज दाखल करून न्याय देण्याची विनंती केली आहे.

पीडितेच्या वकिलांच्या माहितीनुसार, लोनी येथील महिलेचे लग्न दहा वर्षांपूर्वी रइसुद्दीन याच्यासोबत झाले होते. त्यांना चार मुले आहेत. रइसुद्दीन हा रिक्षा चालवतो. १३ जानेवारी रोजी त्याने पत्नीला चहा करण्यास सांगितले. मात्र, तिने चहा तयार करण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. रागाने रइसुद्दीन याने तिला तलाक दिला आणि त्यानंतर रिक्षा घेऊन घराबाहेर निघून गेला.

त्याच दिवशी संध्याकाळी रइसुद्दीन घरी आला. पत्नीने त्याची समजूत काढण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, त्याने काहीही ऐकून घेतले नाही. महिलेने त्याच्याविरोधात पोलिसांतही तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही, असा आरोप आहे. अखेर न्याय मिळावा यासाठी तिने कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here