शेतकऱ्यांना कोटय़ावधींचा गंडा घालणारा व्यापारी गजाआड

  • तपासात कुचराई करणाऱ्या पोलीस निरीक्षकाची बदली
  • जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून केली अटक
  • शेतकरी संघटनेची तपासात मदत

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील माळवडगाव परिसरातील शेतकऱ्यांना कोटय़वधी रुपयांना गंडा घालून पसार झालेला मुन्ना ऊर्फ गणेश रामलाल मुथ्था व त्याची पत्नी आशा गणेश मुथ्था या दोघांना गणपूर (ता. चोपडा, जि. जळगाव) येथून ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांना श्रीरामपूर न्यायालयाने 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मुख्य आरोपी रमेश रामलाल मुथ्था व त्याची मुले भूषण, चंदन हे अजून फरार आहेत.

दोन वर्षांपूर्वी मुथ्था याने माळवडगावात भाडय़ाच्या घरात किराणा दुकान सुरू केले. नंतर चंदन ट्रेडर्स या नावाने होलसेल किराणा, भुसार माल खरेदी विक्री व्यवसाय सुरू केला. अल्पावधीतच त्याने माळवडगावसह मुठेवडगाव, खानापूर, भामाठाण, खोकर, भोकर या भागांतील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. दोन वर्षांत श्रीरामपूर बाजार समितीत सोयाबीनची विक्री करणारा मोठा आडत व्यापारी म्हणून लौकिक मिळविला. या विश्वासावर शेतकऱयांचा कोटय़ावधी रुपयांचा शेतमाल मुथ्था घेत असे. अडीअडचणी आल्यास मुथ्था शेतकऱ्यांना पैसे देत असे. जादा व्याजाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून पैसे घेत असे. नंतर त्याने मालसाठवणुकीसाठी अंबिका पतसंस्थेचे गोडाऊन भाडय़ाने घेतले होते. हेच गोडाऊन एका बँकेकडे गहाण ठेवून कोटय़ावधी रुपये काढले. त्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे 50 कोटी रुपयांना लुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे सर्व पैसे घेऊन 6 फेब्रुवारी रोजी पहाटे मुथ्था कुटुंबासह पळून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट तालुका पोलीस ठाणे गाठत रमेश रामलाल मुथ्था, चंदन रमेश मुथ्या, भूषण रमेश मुथ्था, मुन्ना ऊर्फ गणेश रामलाल मुथ्था याच्याविरुद्ध तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

गणेश मुथ्था हा पत्नीसोबत भडगाव हद्दीलगतच्या गणपूर (ता. चोपडा जि. जळगाव) या ठिकाणी 10 मार्च रोजी भाडोत्री घर घेऊन राहत असून, खारीक खोबरे, मसाल्याचा व्यापारी असल्याचे सांगून चोपडा तालुक्यात धंदा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी चोपडा पोलिसांची मदत घेऊन गणपूर गावातून मुथ्था याला ताब्यात घेतले. दोन मुलांना घरमालकाकडे देऊन मुथ्था व पत्नी आशा यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल, 50 हजार रुपये रोख, एक चारचाकी, एक दुचाकी ताब्यात घेतली आहे.

पोलीस निरीक्षक ममुद खान यांनी तपासाकामी कुचराई करत असल्याच्या तक्रारी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी केल्या होत्या. त्यामुळे खान यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी नियुक्ती झाली. पदभार स्वीकारतानाच मुथ्थाच्या लवकरच मुसक्या आवळणार असल्याचे आश्वासन निरीक्षक साळवे यांनी शेतकऱ्यांना दिले होते.

शेतकऱ्यांना फसवून फरार झालेला व्यापारी गणेश रामलाल मुथ्था व त्याची पत्नी याला शोधण्यासाठी शेतकरी संघटनेने मदत केली. शरद आसने, नानासाहेब आसने, गणपत आसने, सुदाम आसने, विजय आसने, दत्तात्रय दळे यांनी मुंबई, जालना, नगर, यवतमाळ, संभाजीनगर, नाशिक, पुणे, जळगाव येथे शोध घेतला. अखेर चोपडा तालुक्यातून मुथ्था पोलिसांनी पकडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here