टॉन्सिल्सची ऑपरेशननंतर मुलीचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ

सांगली (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – येथील वसंतदादा शासकीय रुग्णालयाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे टॉन्सिल्सच्या शस्त्र्ाक्रियेनंतर 11 वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. घटनेनंतर मुलीच्या नातेवाईकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी सिव्हिल परिसरात जोरदार गोंधळ घातला. यामुळे परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. डॉक्टरांनी चुकीचे ऑपरेशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला.

प्रतीक्षा सदाशिव चव्हाण (रा. पळसवडे, ता. माण, जि. सातारा) असे मृत मुलीचे नाव आहे. प्रतीक्षाच्या टॉन्सिल्सच्या शस्त्र्ाक्रियेसाठी चव्हाण कुटुंबीय गुरुवारी सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. डॉक्टरांनी शनिवारी तिच्यावर शस्त्र्ाक्रिया केली. यानंतर तिच्या तोंडातून मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे ती बेशुद्धही होती. तिच्यावर दुसरी शस्त्र्ाक्रिया करावी लागेल, असे सांगून डॉक्टरांनी दुसरी शस्त्र्ाक्रियाही केली. मात्र, ती बेशुद्धच होती, असे प्रतीक्षाचे वडील सदाशिव चव्हाण यांनी सांगितले. दुसरी शस्त्र्ाक्रिया झाल्यानंतर प्रतीक्षाला अतिदक्षता विभागात दाखल करत असल्याचे डॉक्टरांनी तिच्या नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर दोन दिवस तिच्या प्रकृतीत चढ-उतार होत असल्याचेही डॉक्टर सांगत होते.

दरम्यान, सोमवारी सकाळी अचानक मुलीच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन डॉक्टरांनी प्रतीक्षाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. डॉक्टरांच्या या भूमिकेमुळे नातेवाईक चक्रावले. यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी सांगलीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही मुलीच्या मृत्यूचा जाब विचारत गोंधळ घातला. चौकशी करून कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करू, असे आश्वासन अधिष्ठाता यांनी दिल्यानंतर वातावरण शांत झाले. गेल्या महिन्यात एक मृतदेह अदलाबदलीचा गलथान प्रकार घडला होता. त्यानंतर या मुलीचा मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासन नेमके काय करत आहे, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here