औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – मित्राच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला तलवारीने केक कापून खाऊ घालणाऱ्या दोन जणांना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली. महेंद्र रमेश अहिले (२७), ओंकार विष्णु चव्हाण (२२, रा. दोघे हनुमाननगर) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच एप्रिलला दुपारी एका व्हॉटसअप ग्रुपवर, वाढदिवसानिमित्ताने तलवारीने केक कापून त्याचे छायाचित्र व्हायरल झाले होते. पोलिसांनी दोघांचा शोध घेतला. अहिले याच्या घरी छापा मारून त्याच्यासह चव्हाणलाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. तसेच एक फायबरचे व स्टीलचे कोटींग असलेले लायटरही जप्त करण्यात आले.






