हुंडा दिला नाही म्हणून सूनेची गावभर नग्न धिंड काढली

केंद्रपारा (ओडिसा ) – माणुसकीला काळीमा फासणारी घटना नुकतीच घडली आहे. हुंडा दिला नाही म्हणून सासू-सासऱ्यांनी सूनेला निर्वस्त्र करून तिची गावभर धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या संतापजनक प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांमध्ये संताप पसरलेला आहे.

ओडीशातील केंद्रपारा जिल्ह्यातील कोरुक गावात ही घटना घडली आहे. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तपास केला असता ही कोरुक गावातील घटना असल्याचे कळले. हुंडा न दिल्याने महिलेच्या सासू-सासऱ्यांनी निर्दयी पणाचा कळसच गाठला. आपल्या सूनेची निर्वस्त्र धिंड काढली. महिलेच्या काकाने याबाबत स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर घटनेचा तपास सुरू झाला. निकिराई पोलीस स्थानकाच्या इन्स्पेक्टर काबुली बारिक यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरुक गावातील स्थानिकांनी या महिलेची धिंड थांबवण्यासाठी हस्तक्षेप केला. मात्र तिच्या सासू सासऱ्यांनी त्यांना जुमानले नाही. हुंडा न दिल्याने तिला मारहाण करत तिची धिंड काढत होते.

याप्रकरणी पीडित महिलेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तिच्या सासरची लोकं गावातून फरार झाली असून त्यांचा शोध सुरू आहे. त्यासाठी एका विशेष पोलीस पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल करणाऱ्या लोकांचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here