एक चतुरस्र व्यक्तिमत्त्व : ॲड.डॉ.सुभाषजी अंकुश आरोसकर

    (संपादक सुनिल पाटील)

    आपण समाजात वावरत असतांना आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक स्फुरणीय व्यक्तिमत्वांमधील गुणांमुळे आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो. नकळत त्यांच्या विचारांनी प्रभावित होतो. कधी कधी तर या सन्मार्गावर चालणाऱ्या व्यक्तिमत्वामुळे आपल्या जीवनाची दिशादेखील बदलते. या व्यक्तिमत्वांपैकी एक असणारे प्रभावी वक्तृत्वाचे धनी, ज्ञानाचा वसा घेतलेले मनमिळावू अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे ॲड.डॉ.सुभाष अंकुश आरोस्कर.

    तसे पाहता ॲड.डॉ.सुभाष अंकुश आरोस्कर हे नाव तसे बऱ्यापैकी सर्वांनाच परिचीत असणारे आहे. त्यांच्या नावातच नावातच सु – भाष (सु म्हणजे चांगले आणि भाष म्हणजे भाषा-वक्तव्य-वक्तृत्व) असल्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व मनमिळावू आहे. ज्ञानपिपासू वृत्तीने ज्ञानाचा ध्यास, ज्ञानाची जिज्ञासा, ज्ञानाची लालसा त्यांच्यात जन्मःताच असल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाला अष्टपैलूत्वाचे कोंदण जडले आहे. काही व्यक्ती ज्ञानाचा वसा घेऊनच जन्माला येतात. ज्ञान हा त्यांचा पिंड असतो. जणू ते ज्ञान मिळवण्यासाठी आणि ज्ञानाचे दान करण्यासाठीच जन्माला आलेले असतात. जगाच्या कल्याणासाठीच जन्म झालेला असतो त्यांचा.

    फळांचा राजा हापूस आंबा आणि फणस घडविणाऱ्या पिकविणाऱ्या कोकणच्या लालमातीत जन्माला आलेले सुभाष अंकुश आरोस्कर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील तुळस (पलतडवाडी) गावचे सुपुत्र. ९ एप्रिल १९५५ साली जन्मलेले सुभाष आज वयाने ६६ वर्षांचे असले तरी त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे. त्यांची ज्ञानपिपासू वृत्ती कुठेही कमी झालेली नाही. त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी वाखाणण्याजोगी आहे. त्यांचे १ली ते ७वीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत झाले. ८वी ते ११वी पर्यंतचे शिक्षण परेलच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये पार पडले त्यांचे पुढील महाविद्यालयीन शिक्षण दादरच्या कीर्ती कॉलेजमध्ये झाले त्यांनतर त्यांनी के सी लॉ कॉलेज येथून कायद्याची पदवी घेतली.

    कायद्याची पदवी मिळवल्यानंतर फक्त वकिली करण्यात स्वारस्य न मानता ज्ञानाची विविध क्षेत्रे त्यांनी पादाक्रांत केली. त्यांनतर मिठीबाई कॉलेजमधून त्यांनी कायदा विषयात मास्टर्स (एल एल एम) डिग्री घेतली. त्यांनी प्रतिष्ठित अशी डॉक्टरेट मराठवाडा विद्यापीठातून मिळवली.नवी दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ह्युमन राईट्स येथून ह्युमन राईट्स (मानव हक्क) पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा केला. २०१२ मध्ये अण्णामलाई युनिव्हर्सिटीमधून व्हॅल्युएशन एज्युकेशन अँड स्पिरिचुलिटी मध्ये पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

    सामाजिक बांधिलकीची जाणिव ठेवत समाजप्रबोधनाचे कार्य करण्यासाठी त्यांनी प्रबोधन प्रकाशन मधून ‘मराठी वृत्तपत्रसृष्टीची तोंडओळख’ या प्रशिक्षण वर्गात पत्रकारितेचे प्रशिक्षण घेतले. श्रीलंका येथून त्यांनी कायदा विषय घेऊन आंतरराष्ट्रीय डीएससीची डिग्री घेतली आणि त्यांची नियुक्ती डॉक्टरेट गाईड म्हणून झाली आहे. ज्ञानाच्या कक्षा रुंदावणाऱ्या पदव्यांबरोबरच त्यांनी कला क्षेत्रातही आपला नावलौकिक मिळवला. गमभन चित्रच्या बॉम्बे वॉर या चित्रपटात त्यांनी केलेली वकिलाची भूमिका सर्वांना भावली. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती ते स्वतः आणि त्यांचे बंधू देवदास आणि ज्ञानदेव या तिघांनी मिळून केली होती.

    महाराष्ट्राच्या समृध्द अशा लोककलेच्या वारशामध्येही त्यांचे योगदान आहे. शाहीर दत्ता ठुले आणि मंडळी यांच्या कलापथकातून त्यांनी विविध भूमिका केल्या. तसेच दूरदर्शन, आकाशवाणीवर होणाऱ्या अनेक कार्यक्रमांत सहभाग घेतला. श्रीदेवी सातेरी निर्मित मधुमाधव प्रॉडक्शनमध्ये त्यांनी कलाकार म्हणून काम केले. तसेच सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही जबाबदारीही पार पाडली. महाराष्ट्र शासनाच्या कलाविषयक होणाऱ्या अनेक कार्यक्रमांतदेखील त्यांनी आपला भरीव ठसा उमटवला आहे.

    आरोग्य क्षेत्रातील ज्ञान प्राप्त करून या विविषयातदेखील त्यांनी आपले कार्यक्षेत्र रुंदावले. रेकी, नॅचरोथेरपीचे अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केले. कलासक्त मनाला फोटोग्राफीची आवड नसेल असे कुठे होते. फोटोग्राफीची त्यांना आवडच नाही तर ते त्यासाठी सवडदेखील काढतात. या सर्व छंदांचे रीतसर प्रशिक्षण त्यांनी घेतले. विविध क्षेत्रातील ज्ञानकण वेचण्याचा जणू त्यांना छंदच आहे म्हणाना.

    चित्रपट, ज्ञान, कला यात मास्टरी मिळवून ते थांबले नाहीत तर त्यांनी क्रीडा क्षेत्रातही विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपण त्यातही कमी नाहीत हे सिद्ध केले. ॲड.डॉ.सुभाष अंकुश आरोस्कर यांचा ज्ञानापासून सुरू झालेला प्रवास नोकरीच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातही उमटला आहे. भारत सरकारच्या ओएनजीसी लि. या कंपनीत त्यांनी ३२ वर्षे नोकरी केली. या नोकरीदरम्यान त्यांच्या मेहनती व सातत्याने नवनवीन शिकण्याच्या जिज्ञासेने त्यांना दहा पदोन्नती मिळवून दिली आहे. नोकरीतील काळात त्यांच्यातील संघटन कौशल्यामुळे त्यांनी युनियन कार्यातही मोलाचा सहभाग दिला. ओएनजीसी हेली बेस व ओएनजीसी न्हावा सप्लाय बेस या दोन्ही ठिकाणी बारा वर्षे त्यांनी युनियनच्या कार्यक्षेत्रात काम केले. विशेष म्हणजे या एक तपात त्यांची प्रत्येक वेळी बिनविरोध निवड झाली आहे.

    यासोबतच त्यांचे महत्त्वाचे आणि आवडीचे काम म्हणजे समुपदेशन आहे. हे कार्य ते गेल्या ३५ वर्षांपासून करत असून, त्यासाठी त्यांनी आपल्या एका बेडरुमचे कार्यालयात रुपांतर केले आहे. त्यामुळे दिवसाचे २४ तास ते जनसेवेसाठी तत्पर असतात. व्यावसायिक तसेच कुटुंब कोर्टाचे ते वकील आहेत, सोबत सुप्रिम इस्टेट ॲडव्हायझर म्हणूनही ते काम करतात. प्लॅटिनम कॉर्प या कंपनीचे ते लिगल ॲडव्हायझर असून, गेल्या सात वर्षांपासून जीवन विद्या मिशन या सेवाभावी संस्थेत नामधारक म्हणून कार्यरत आहेत. सद्‌गुरु वामनराव पै माऊली यांचे चिरंजीव व आजीव विश्वस्त आदरणीय वन्दनीय श्री प्रल्हाद दादासाहेब पै यांचे मार्गदर्शन आपल्याला सतत लाभत असते असे सांगून ते दादासाहेबविषयी कृतज्ञता व्यक्त करतात.
    विविध क्षेत्रातील नैपुण्यासह त्यातील सखोल ज्ञानाच्या जोरावर आपल्या कार्याने त्यांनी केवळ नावलौकिकच कमावला नाही तर आपल्या ज्ञानकक्षा रुंदावत ते आजही समाजकार्यासाठी तत्पर आहेत. ज्ञानचक्षूंनी अनेकांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारी व्यक्ती हजारात नव्हे तर लाखात एक असते म्हणूनच ॲड.डॉ.सुभाष अंकुश आरोस्कर यांचा एक अष्टपैलू चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणून गौरव होणे उचितच आहे.

    आज ९ एप्रिल २०२१ शुक्रवारी त्यांनी वयाची ६६ वर्षे पूर्ण करून ते ६७ व्या वर्षात पर्दापण करीत आहेत. त्यांना वाढदिवसानिमित्त तसेच पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी बुलंद पोलिस टाइम्सतर्फे उदंड, निरामय आयुरारोग्यपूर्ण आयुष्य मिळावे व ईश्वर त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत, हीच सदिच्छा आणि मनस्वी अभीष्टचिंतन!

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here