ठाणे महापालिकेचा आरोग्य अधिकारी पाच लाखांची लाच घेताना रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – कोविडच्या महामारीत स्वतःचे उखळ पांढरे करणाऱ्या ठाणे महापालिकेचा मुख्य आरोग्य अधिकारी राजू मुरुडकर याला पाच लाख रुपयाची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (अँटी करप्शन ब्युरो) अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. पंधरा लाखाची लाच मागून त्याचा पहिला पाच लाख रुपयांचा हप्ता घेताना मुरुडकरवर अँटी करप्शनने झडप घातली.

ठाणे महापालिकेला 30 वेंटिलेटर पुरवण्याची निविदा मंजूर करून देतो असे डॉ. राजू मुरुडकर याने नवी मुंबईतील इमिनो शॉपचा मालक शिवम भल्ला यांना सांगितले. एकूण निविदा रकमेच्या दहा टक्के रक्कम म्हणजेच पंधरा लाख रुपये मुरुडकर याने भल्ला यांच्याकडून लाच म्हणून मागितले. त्यातील पहिला पाच लाख रुपयांचा हप्ता मुरुडकर याने तातडीने मागितला. भल्ला यांनी याबाबत अँटी करप्शन ब्युरोला माहिती दिली.

पाच लाख रुपयांची लाचेची रक्कम मुरुडकर याने त्याच्या ऐरोली येथील लाईफ लाईन या खाजगी रुग्णालयात आणून देण्यास सांगितले. त्यानुसार अँटिकरप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. भल्ला याने लाईफलाईन रुग्णालयात मुरुडकर याला पाच लाख रुपये देताच अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले. कोविडच्या महामारीचा फायदा घेत लाचखोरीने स्वतःचे उखळ पांढरे करणाऱ्या लोकसेवकाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here