जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगांव पोलीस स्टेशनची गाडी खराब होती, कुठेही बंद पडत होती. या गाडीच्या इंजिनमध्ये खूप काम होते. त्यामुळे गुन्हेगार पकडण्यासाठी तसेच रात्रीची गस्तीसाठी अडचणी येत होत्या.
नवीन गाडी मिळावी म्हणून पोलीस निरीक्षक हिरे यांनी तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन यांनी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांना धरणगांव पोलिस स्टेशन चे वाहन संदर्भात सतत पाठपुरावा केला.
या पाठपुराव्याची व पोलिसांना येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी धरणगाव पोलीस स्टेशनसाठी नवीन स्कार्पिओ गाडी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल पोलीस निरीक्षक हिरे तसेच गुलाबराव वाघ, पी.एम.पाटील, निलेश चौधरी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.






