पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – उरुळी कांचन बाजार परिसरातील एका दुकानातील ८० हजार रुपयांच्या बांगड्या फोडून नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहारूख मन्यार (वय २८, रा. उरुळी कांचन) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन बाजारात मन्यार यांचे बांगड्याचे दुकान आहे. त्यांनी दुकानातील कॉटवर बांगड्या ठेवल्या होत्या.
अज्ञात व्यक्तीने नुकसान करण्याच्या उद्देशाने त्या सर्व बांगड्या फोडल्याचे आढळून आले. यामध्ये मन्यार यांचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी लोणीकाळभोर पोलिस अधिक तपास करत आहेत.






