माथाडी मंडळाच्या खात्यातून बनावट धनादेशाद्वारे 5 कोटी गायब

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – माथाडी मंडळाच्या बचत खात्यातून बनावट धनादेशद्वारे तब्बल ५ कोटी ६ रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे पैसे मध्यप्रदेश, छत्तीसगड, रायपूर येथील खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

सहायक कामगार आयुक्त अशोक लक्ष्मण डोके (५३) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ फेब्रुवारीपासून रेल्वे गुडस्‌ क्लीअरिंग अँँड फाॅरवर्डिंग एस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्ड, मुंबई या माथाडी मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. ८ फेब्रुवारीपासून ते या पदावर कार्यरत आहेत.

याच मंडळाचे बचत खाते मस्जिद बंदर येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत आहे. डोके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या महिन्यात बँक खात्याचा तपशील मागवला. यात, पासबुक नोंदीतून समोर आलेल्या माहितीत यावर्षी ७ जानेवारी ते १२ मार्चदरम्यान बनावट धनादेशाद्वारे खात्यातील ५ कोटी ६ लाख इतकी रक्कम अन्य ठिकाणी ट्रान्स्फर करण्यात आल्याचे दिसून आले.

त्यांनी तात्काळ याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, हे पैसे बँकेकडून बँकेच्याच मध्यप्रदेश, छत्तीसगड, रायपूर येथील शाखेत वर्ग करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यात, मंडळाच्या बनावट धनादेश आणि स्वाक्षरीचा वापर करण्यात आला. याचे सर्व मूळ धनादेश मंडळाकडे आहेत. अशात, एवढ्या मोठ्या स्वरूपात रक्कम ट्रान्स्फर होत असताना बँकेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत मंडळाच्या अधिकाऱ्यांना कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

अशात, बँक ऑफ बडोदा यांचे संबंधित शाखा व्यवस्थापक, कर्मचारी, अधिकारी व इतर अनोळखी इसम यांनी एकमेकांशी फौजदारी कट रचून व संगनमत करून फसवणुकीच्या उद्देशाने व सदरच्या रकमेचा अपहार केल्याचा संशय वर्तवत त्यांनी तात्काळ पायधुनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार ६ एप्रिल रोजी पायधुनी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here