दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पास करा, पॅरेंट्स असोसिएशनचे पंतप्रधानांना पत्र

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्यासह देशभरात कोरोनाची स्थिती बिकट बनली असताना महाराष्ट्रात बारावीची लेखी परीक्षा तोंडावर आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोनाची स्थिती लक्षात घेऊ दहावी, बारावीसह विद्यापीठांच्या परीक्षा या अंतर्गत मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना पास करण्याचे धोरण जाहीर करावे, अशी मागणी इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाव्यात, अशी मागणी राज्यातील विद्यार्थी मागील महिनाभरापासून करत आहेत. त्यासाठी अनेक शहरांमध्ये आंदोलनेही करण्यात आली, परंतु त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.

राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी केंद्र सरकारने धोरण जाहीर करावे आणि राज्याला तशा सूचना द्याव्यात अशी मागणी असोसिएशनच्या अॅड. अनुभा सहाय यांनी केली आहे. विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेला अभ्यासक्रम आणि विविध प्रकारच्या प्रात्यक्षिक अथवा सराव परीक्षा यांचे अंतर्गत मूल्यमापन करून त्यांना पास करावे यासाठी केंद्र सरकारने राज्याला सूचना द्याव्यात अशी मागणी सहाय यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here