नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड लसीकरणाला सुरूवात

कोविड लसीकरण केंद्रांमध्ये 4 महानगरपालिका आणि 4 खाजगी रूग्णालयांतील नवीन केंद्रांची भर

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – नवी मुंबई महानगरपालिकेस शासनाकडून कोव्हीशील्ड लसीचे 20 हजार डोसेस प्राप्त झाले असल्याने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाला पूर्ववत सुरूवात झालेली आहे. आत्तापर्यंत महापालिका क्षेत्रात 1 लक्ष 44 हजार 459 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

नागरिकांना घराच्या जवळच लसीकरण केंद्र उपलब्ध असावे व त्यांना कमीत कमी वेळेत लस घेऊन घरी परतता यावे याकडे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सुरूवातीपासून बारकाईने लक्ष दिले असून त्याकरिता सातत्याने लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे.

आजही महानगरपालिकेची 4 नवीन केंद्रे सुरू करण्यात आली असून 19 नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सुरू असलेल्या लसीकरण केंद्रांप्रमाणेच नेरूळ फेज 1, नेरूळ फेज 2, नोसीलनाका व महापे या चार नागरी आरोग्य केंद्रांमध्येही आजपासून लसीकरणाला सुरूवात करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेच्या सर्व 23 आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच आता महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ, ऐरोली या तिन्ही रूग्णालयात 24 x 7 दिवसरात्र लसीकरण केंद्रे सुरू आहेत. याशिवाय तुर्भे येथील रामतनु माता बाल रूग्णालय आणि 23 नागरी आरोग्य केंद्रे याठिकाणी सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत लसीकरण सुरू आहे. त्याचप्रमाणे सेक्टर 5 वाशी येथील ईएसआयएस रूग्णालयामधील जम्बो लसीकरण केंद्रात 4 बूथवर सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत 2 सत्रात लसीकरण सुरू आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कार्यान्वित केंद्रांवर आठवड्याचे सातही दिवस मोफत लसीकरण करण्यात येत आहे.

याशिवाय लसीकरण सुरू असलेल्या 17 खाजगी हॉस्पिटलमध्ये आणखी 4 खाजगी हॉस्पिटलची आजपासून भर पडलेली असून एमजीएम हॉस्पिटल सेक्टर 4 सीबीडी बेलापूर, न्यू मानक हेल्थकेअर सेक्टर 8 नेरूळ, न्यू मिलेनियम हॉस्पिटल सेक्टर 9 नेरूळ आणि क्रिटीकेअर हॉस्पिटल सेक्टर 5 ऐरोली अशा आणखी 4 खाजगी रूग्णालयांमध्येही कोव्हीड लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. अशाप्रकारे आता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या 4 बूथच्या जम्बो लसीकरण केंद्रांसह 28 रूग्णालये / नागरी आरोग्य केंद्रे याठिकाणी तसेच 21 खाजगी रूग्णालये याठिकाणी अशा प्रकारे एकूण 49 कोव्हीड लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जात आहे.

कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस 13422 नागरिकांनी घेतलेला असून आजपासून कोव्हॅक्सिनच्या दुस-या डोसलाही सुरूवात करण्यात आलेली आहे. प्रत्येक व्यक्तीने ठराविक दिवसांच्या अंतराने लसीचे दोन डोस घेणे अनिवार्य असून कोव्हीशील्ड व कोव्हँक्सिन यापैकी ज्या लसीचा पहिला डोस घेतला आहे त्याच लसीचा दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महानगरपालिका पूर्णपणे सतर्क आहे.

आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणाचा तपशील –
* पहिला टप्पा – डॉक्टर्स व इतर आरोग्यकर्मी – 25516 (पहिला डोस) / 13584 (दुसरा डोस)
* दुसरा टप्पा – पोलीस, सुरक्षा. स्वच्छता व इतर पहिल्या फळीतील कोरोना योध्दे – 19226 (पहिला डोस) / 6963 (दुसरा डोस)
* तिसरा टप्पा – ज्येष्ठ नागरिक – 50007 (पहिला डोस) / 677 (दुसरा डोस)
* 45 वर्षावरील कोमॉर्बीड व्यक्ती – 10277 (पहिला डोस) / 262 (दुसरा डोस)
* 45 ते 60 वयाचे नागरिक – 39433 (पहिला डोस) / 000 (दुसरा डोस)
* एकूण – 144459 (पहिला डोस) अशाप्रकारे आत्तापर्यंत 1 लक्ष 44 हजार 459 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

कोव्हीडची लस घेतलेल्या कोणत्याही नागरिकास मोठ्या प्रमाणात त्रास झालेला नसून ही लस पूर्णत: सुरक्षित आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी व लसीकरणासाठी आपला क्रमांक येईल तेव्हा अवश्य लस घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here