पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – दोन वर्षांची गॅरंटीसह 32 इंची टीव्ही प्रत्येकी साडे 7 हजार रूपयांना देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्याने तरूणाला 6 लाखांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना 25 ते 28 जानेवारीला बिबवेवाडीत घडली. याप्रकरणी रोहन कांबळे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन कुटूंबियासह बिबवेवाडीत राहायला आहे. 25 जानेवारीला एकाने त्यांना फोन करून 32 इंची 140 टीव्ही प्रत्येकी साडेसात हजारांना देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी सायबर चोरट्याने उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका कंपनीचे लेटरहेड रोहनला व्हॉट्सअॅपवर पाठविले. त्यामुळे कमी किंमतीत टीव्ही मिळणार असल्यामुळे रोहनने सायबर चोरट्यावर विश्वास ठेवला.
त्यानुसार त्यांनी ऑनलाईनरित्या 6 लाख रूपये संबंधिताच्या बँक खात्यावर वर्ग केले. रक्कम जमा करूनही टीव्ही न मिळाल्यामुळे फसवणूक झाल्याचे रोहनच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अनिता हिवरकर तपास करीत आहेत.






