पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे शाखेने कारवाईची मोहिम उघडली आहे. जादा नफा कमविण्याच्या हेतूने डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शशिवाय रेमडेसिविरची विक्री करणाऱ्या तरूणाला गुन्हे शाखेने भवानी पेठेतून अटक केले. त्याच्या ताब्यातून रेमडेसिविरची दोन इंजेक्शनसह 26 हजार 500 रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शिवाजी हनुमंत सावंत (वय 24, रा. खरातवाडी, पंढरपूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करण्यात येतो. त्यामुळे शहरात इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे रेमडेसिविरची जादा दराने विक्री केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून संबंधितांविरूद्ध कारवाई करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, काल रात्री भवानी पेठेतील मारूती मंडळ चौकात एकजण जादा दराने रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करण्यासाठी थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनीट तीनला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून शिवाजी सावंतला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडे दोन इंजेक्शन आणि रोकड मिळून 26 हजार 340 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. जीवनावश्यक वस्तुंचे अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






