(साभार योगेश शुक्ल यांच्या फेसबुक वॉलवरून)
आजपासून रमजानचा महिना सुरू होत आहे. रमजान म्हणजे वेगवेगळे खाद्यपदार्थ खाण्याचा महिना आहे. ही एक व्यंजनजत्रा आहे. देशोदेशीचे खाद्यपदार्थ, उच्चप्रकारच्या मिठाया बाजारात उपलब्ध होतात. मुसलमान रात्रभर त्या मिठाया-अन्नपदार्थ खातात आणि दिवसभर उपाशी राहतात, असे अनेकांना वाटते. पण रमजान म्हणजे खरच काय? त्याचे महत्व का आहे आणि रोजे आणि नमाजचेही महत्व काय हे जाणून घेऊया…
मुस्लिम अथवा हिजरी कालगणनेनुसार रमजान हा २९-३० दिवसांचा नववा चांद्रमास. त्याचा रमजान हा शब्द कडक अथवा भाजून होरपळून टाकणारी उष्णता या अर्थी असलेल्या ‘रमीद’ अथवा ‘अर-रमद’ या अरबी धातूपासून तयार झाला आहे. तो रमझान किंवा रमदान या नावानेही रूढ आहे. इस्लाम धर्माच्या श्रद्धा (शहद), प्रार्थना किंवा नमाज (सलत), दानधर्म (जकात), उपवास (सवम), आणि मक्केची यात्रा (हज) या पाच मुख्य तत्त्वांपैकी रमजान महिन्यातील उपवास हे एक तत्त्व आहे.मुस्लिम बांधवांसह इतर धर्मीयही या महिन्यात उपवास अर्थात रोजे करतात. यामध्ये सकाळी सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाण्याचा एक थेंबही न घेता अत्यंत कडक उपवास पाळला जातो. धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे सर्वच मुस्लिम मुसलमान नाहीत. जो मुसलमान पांच कर्तव्याचे पालन करत नसेल तर तो इस्लाम मानणारा असू शकत नाही. इस्लाम मानणारा मुस्लिम इमानदार, नमाज पढणारा, रोजा ठेवणारा, हज करून आलेला आणि न चुकता समाजाच्या उन्नतीसाठी दरवर्षी जकात भरणारा असतो. मानव प्राण्यावर नेहमी प्रेम करतो. सहानुभूती दाखवितो आणि नियमितपणे सहायता करतो, तो मुसलमान.
रमजान हा इस्लामी कालगणनेनुसार नववा चांद्रमास. रमजान शब्दाची निर्मिती ‘रम्ज’ या शब्दापासून झालेली आहे. खरीप हंगामात पडणाऱ्या पावसास रम्ज म्हणतात. या महिन्याचे कृपा, क्षमा आणि मोक्ष असे तीन विभाग असल्याचं मानलं जातं. या महिन्यात पावसाप्रमाणे परमेश्वराची कृपा व क्षमेचा वर्षाव होत असतो. रमजान सर्व महिन्यांत श्रेष्ठ महिना आहे. या महिन्याची एक रात्र हजार महिन्यांहून अधिक श्रेष्ठ मानली जाते. या महिन्यातले महिनाभरचे उपवास अल्लाहने अनिवार्य ठरविले आहेत. रमजान महिन्यात इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ कुराणाच्या अवतरणाचा प्रारंभ झाला, म्हणून या महिन्यात उपवास केले जातात. त्यांना ‘रोजे’ असे म्हणतात. उपवासाची सुरुवात रमजान महिन्यात प्रथम चंद्रदर्शन झाल्यानंतर येणाऱ्या पहाटेपासून होते.
इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक असल्याने कुराणात (कुरआनात) याविषयीची आज्ञा खालीलप्रमाणे आहे :
“हे ईमानवाल्यांनो तुमच्याकरिता रोजे अनिवार्य ठरविले गेले. ज्याप्रमाणे तुमच्या पूर्वीच्या पैगंबरांच्या अनुयायांवर अनिवार्य केले गेले होते. अपेक्षा आहे की, यामुळे तुमच्यात ईश्वराचे भय निर्माण होईल… रमजान तो महिना आहे, ज्यामध्ये कुराणाचे अवतरण झाले. जो मानवाकरिता पूर्ण मार्गदर्शन आहे व त्यात अशा स्पष्ट शिकवणी समाविष्ट आहेत ज्या सरळ मार्ग दाखविणा-या आणि सत्य व असत्य यांमधील फरक उघड करून दाखविणाऱ्या आहेत. म्हणून यापुढे ज्या व्यक्तीला हा महिना मिळेल त्याला हे आवश्यक आहे की, त्याने या पूर्ण महिन्याचे रोजे (उपवास) करावेत आणि जो कोणी आजारी असेल किंवा प्रवासात असेल, त्याने इतर दिवसांत सुटलेले उपवास पूर्ण करावेत. अल्लाह तुमच्याशी सौम्य व्यवहार करू इच्छितो, कठोर व्यवहार करू इच्छित नाही म्हणून ही पद्धत तुम्हाला दाखविली जात आहे की, ज्यामुळे तुम्ही उपवासांची संख्या पूर्ण करू शकाल आणि ज्या मार्गदर्शनाने अल्लाहने तुम्हाला गौरवान्वित केले आहे, त्याबद्दल अल्लाहच्या महानतेचा मनापासून स्वीकार करा, कृतज्ञ बना आणि अल्लाहच्या महानतेचे गुणगान करा.” (सूरह अल बक्र – आयती १८३…८४…८५).
या महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न-पाणी सेवन न करता कडक उपवास केले जातात. सर्व मुस्लिम स्त्री-पुरुषांना हे उपवास बंधनकारक आहेत. लहान मुले, वेडसर व्यक्ती यांना उपवास न करण्याची सवलत असते. तसेच गर्भवती वा तान्हे मूल असलेल्या व मासिक पाळीत असलेल्या स्त्रिया; आजारी व प्रवासी यांनाही या नियमांत थोडीफार सूट मिळू शकते. त्यांनी त्या काळात दानधर्म करावा आणि अन्य काळात उपवास करावेत अशी अपेक्षा आहे.
रमजानमध्ये रोजा पकडणे म्हणजे सर्व वाईटावर विजय मिळविण्यासाठी तयार करणे होय.रोजा पकडला असेल तर वाईट मार्गापासून दूर राहिले पाहिजेच व वाईट लोकांच्या जवळपास थांबायला मनाई असते. रोजा जेव्हा पकडला जातो तेव्हा भूख, तहान काय असते यांची त्यांना जाणीव होते त्यामुळेचा भुकेल्या, तहानलेल्या माणसाला पाहून रोजा पकडणार्याच्या मनात दया येते. सकारत्मक विचाराचे मनात घर पक्के होते. त्यातुनच दान करण्याची इच्छा होते. त्यामुळे मनाची एकाग्रता लागते. उत्पन्नात मोठी वाढ होते. रोजा सुरू असतानांच वर्षभराची जकात भरली जाते. रोजा पकडणार्या व्यक्तीबद्दल समाजात आदर निर्माण होतो. खोटे बोलून फसवणूक, हिंसा, निंदा, चुगली, भ्रष्टाचार करणे यापासून वेगळे राहण्याची प्रेरणा मिळते. म्हणूनच एक महिन्याच्या रोजात या सर्व वाईट गोष्टी पासून वर्षभर दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली जाते.
उपवास करणाऱ्या व्यक्तीने उपवासाच्या प्रारंभी आणि उपवास सोडताना उपवासाचा हेतू (नियत) स्पष्ट केला पाहिजे, अशी ईश्वरी आज्ञा आहे. रमजानच्या उपवासात उद्देश (निय्यत) महत्त्वाचा आहे. तुम्ही दिवसभर काही न खाता, पिता उपाशी राहिले, तर ती उपासमार आहे. ‘रोजा’ म्हणजे ईश्वराचे सानिध्य (उप-वास) मिळविण्याकरिता उपाशी राहणे आणि सत्कृत्ये करून अल्लाहला प्रसन्न करणे होय. उपवास करण्याचा मुख्य हेतू चित्तशुद्धी व्हावी, मनावरील संयम वाढावा आणि वाईट गोष्टींना दूर ठेवण्याची क्षमता प्राप्त व्हावी, हा असतो. म्हणून या महिन्यात वाईट अथवा खोटे बोलणे, धूम्रपान-मद्यपान करणे, दुसऱ्याला त्रास देणे, प्रणय करणे निषिद्ध मानले आहे. मुहंमद पैगंबरांनी सांगितले आहे की, “माणसाने उपवासाच्या काळात वाईट मनोवृत्तीपासून अलिप्त राहिले पाहिजे, इतकेच नव्हे तर संतापून जाता कामा नये. खोटे बोलणे किंवा दुसऱ्याची निंदा करणे यांपासून दूर न जाणाऱ्यांचा उपवास परमेश्वराच्या दृष्टीने व्यर्थ आहे.” अर्थात, या काळात अधिकाधिक सद्वर्तन अपेक्षित आहे.रमझानच्या काळात डोळे, कान आणि तोंडाचा चुकीचा वापर वर्ज्य आहे. म्हणजेच वाईट ऐकणे, बघणे किंवा बोलणे या तिन्ही गोष्टींना या काळात मनाई असते. रोजा म्हणजे रोखणे. परंतु या काळात केवळ तहान-भूक या गोष्टींवरच नियंत्रण आणले जाते असे नाही तर अनेक चुकीच्या गोष्टी कायमस्वरूपी दूर करण्याची प्रेरणा देऊन जाणारा उत्सव असतो. आता त्यात चांगले घेणारा चांगलेच घेणार! वाईट विचार करणार्या माणसाला तुम्ही किती चांगले सांगा तो या कांनाने ऐकणार व दुसर्या कानाने सोडून देणार.कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वःतापासून करावी लागते.
रमजानच्या काळात विशेष प्रार्थना म्हटल्या जातात. प्रतिदिन उपवास सोडल्यानंतर रात्री जी प्रार्थना केली जाते, तिला ‘तराविह’ अशी संज्ञा आहे. अनेक मुसलमान या महिनाभराच्या काळात काही विशिष्ट काळासाठी मशिदीमध्ये एकांतात बसून कुराणाचे पठन करतात. या एकांतवासामध्ये ते आवश्यक कारणाशिवाय आपले स्थानही सोडत नाहीत. संपूर्ण काळ ते ईश्वराच्या सान्निध्यात राहतात. तसेच या काळात गोरगरिबांना दानधर्मही केला जातो. रमजानच्या काळात सूर्योदयापूर्वी जे भोजन केले जाते त्याला ‘सहरी’ असे म्हटले जाते, तर सूर्यास्तानंतर जे भोजन केले जाते त्याला ‘इफ्तार’ असे म्हटले जाते.
या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवसाच्या रात्रीला ‘लैलतुलकद्र’ अथवा ‘शब-इ-कद्र’ म्हटले जाते. ही रात्र पुण्यप्रद हजार महिन्यांपेक्षाही उत्तम असते, असे कुराणात सांगितले आहे. या वेळी ऊद-उदबत्त्या पेटविल्या जातात. प्रार्थना, कुराणाचे पठन होते. या रात्री जे लोक रात्रभर जागे राहतात, त्यांना स्वर्गातून देवदूत आशीर्वाद देतात. ही रात्र मंगलप्रद असून अभय व शांतीची रात्र आहे, असे समजले जाते.
रमजानच्या पवित्र मासात स्वर्गाची द्वारे सताड उघडली जातात. तसेच ह्या मासात श्रद्धेने उपवास पाळणारास गतजीवनात त्याने केलेल्या सर्व पापांना परमेश्वर क्षमा करतो. या महिन्यात उर्मट सैतानास जखडून ठेवले जाते. ‘रमजान’ या अरबी शब्दात समाविष्ट असलेल्या पाच वर्णाक्षरांवरून त्याचा महिमा पुढीलप्रमाणे स्पष्ट होतो : परमेश्वराची इच्छा, त्याचे प्रेम, त्याचे अभयदान, त्याचा स्नेह (करुणा) व त्याचा दैवी प्रकाश या सर्व गोष्टींचा समावेश म्हणजे पवित्र रमजान मास होय.
. हा संयम पाळण्याचा महिना आहे आणि संयमाचा मोबदला स्वर्ग अर्थात चांगले परिणाम होय. हा सदाचरणाचाही महिना आहे. दिवसभर अन्न-जल वर्ज्य, धूम्रपान निषिद्ध, चुकीचं बोलणं टाळावयाचं व पवित्र कुराणपठणात मग्न रहायचं इ. आचार सुचविण्यात आले आहेत. रमजान ‘उष्ण दगडा’ला म्हणतात. यापूर्वी केलेलं पाप अर्थात चुकीच्या गोष्टी या उपवासामुळे दूर होतात असा समज असल्याने या महिन्यास रमजान म्हणतात.
रमजानचा पवित्र व शुभ महिना संपल्यावर चंद्रदर्शन होताच ‘शव्वाल’ ह्या दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी महिनाभराच्या उपवासाचे पारणे फेडताना ‘रमजान ईद’ किंवा ‘ईद उल्-फित्र’ साजरी केली जाते. शव्वालची चंद्रकोर एकीकडे ईद उल्-फित्रच्या आनंदाची ग्वाही देते, तर दुसरीकडे रमजानचे उपवास संपल्याचे सांगते. ईदचा अर्थ पूर्वपदावर येणे असा आहे. म्हणजे उपवास इ. विधी सोडून नेहमीचे जीवन जगणे. आनंदोत्सवात ईमानधारकांनी पैशाची उधळपट्टी करू नये, आपले वर्तन संयमी, विनयशील आणि कृतज्ञतेचे ठेवावे म्हणून ईदच्या दिवशी ईदगाहवर जाऊन दोन रकात नमाज अल्लाहचे आभार आणि कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता पढली जाते. ईदगाहला येण्यापूर्वी उपवास धारकाच्या परिसरातील दुर्बल व्यक्तींना प्रत्येक उपवासधारकाच्या वतीने किमान दोन किलो गहू शक्य तितके लपवून दिले जातात. याचा हेतू हाच की, त्याने खाऊन-पिऊन ईदगाहला नमाजीकरिता यावे. या दोन किलो गव्हाच्या (किंवा प्रचलित धान्याच्या) हिश्याला ‘फित्रा’ असे म्हणतात. म्हणूनच या ईदला फित्रा वाटप करण्याची ईद म्हणून ‘ईदुल-फित्र’ असे म्हणतात.
‘ईद’ म्हणजे आनंद किंवा खुशी; ‘फित्र’ म्हणजे मुभा किंवा मोकळीक. ‘ईद-उल्-फित्र’ म्हणजे निर्बंध मोकळे झाल्याची खुशी वा आनंद; रोजांच्या कडक उपवासांचं बंधन संपलं असून खाण्यापिण्याचा आनंद लुटण्याची मुभा व आनंद. रमजान ईद हा आनंद साजरा करण्याचा, मौजमजा करण्याचा उत्सव. सार्वजनिक प्रार्थना म्हणजे नमाज पढण्याची तयारी व प्रत्यक्ष मशिदीत जाऊन नमाज पढणे, हा तसा रमजानचाच एक भाग आहे. या दिवशी मुसलमान बांधव भल्या पहाटे उठून तयार होऊन नवी वस्त्रं परिधान करतात. घर व अंगण स्वच्छ करून ते सजवितात. नंतर मशिदीत जाऊन नमाज पढतात आणि सगळ्यांना गळ्यात गळा घालून भेटतात व ‘ईद मुबारक हो’ असं म्हणून शुभेच्छा देतात. नंतर घरी येऊन नातेवाईक, आप्तजन व मित्रांना भेटून शुभेच्छा देतात; त्यांना गोडधोड खाऊ घालतात. ह्या वेळी मिठाई व शिरखुर्मा वगैरे पक्वान्नं करण्याची प्रथा आहे. यावेळी ऐपतीप्रमाणे गरजूंना दानधर्मही केला जातो.
अत्यंत पवित्र, समाजाचे कल्याण करणारा, सहसंवेदना जागवणारा, सुख-शांती-समाधानाचा संदेश देणारा, वाईट कर्मांपासून दूर ठेवणारा, दानधर्माचे महत्त्व अधोरेखित करणारा रमझानचा महिना आणि ईद-उल-फित्रचा सण आहे. मुस्लीम धर्माचे पालन करणार्या प्रत्येकांसाठी मानवतेची अनोखी शिकवणच आहे. ‘प्रेम दिल्याने वाढते’ असे म्हणतात. त्यामुळे या सणाच्या माध्यमातून विविध धर्मीयांमध्ये प्रेम वाढीस लागावे, अशी अपेक्षा असते. डिजिटल इंडिया, स्मार्टफोनच्या आजच्या वातावरणात ती आता काळाची गरज ठरू पाहत आहे. यातूनच विश्वबंधुत्वाची संकल्पना प्रत्यक्षात येण्यास मदत होणार आहे.म्हणूनच रमजान म्हणजे काय? प्रत्येक माणसाला माहिती असणे आवश्यक आहे.






