मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – राज्यात एकीकडे नागरिक उकाडामुळे हैराण आहेत तर दुसरीकडे मागील दोन- तीन दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यातील नागरिकांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. तसेच येत्या काही वेळात पुणे , नंदुरबार, धुळे , जळगाव आणि सातारा या जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली. मागील आठवड्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. काल लातूर, परभणी, जालना, औरंगाबाद, सोलापूर या जिल्ह्यांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यात आज देखील पुण्यासह सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी.






