अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारात दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेसह नगर तालुका पोलिसांना यश आले आहे. यात मोक्काच्या गुह्यात फरार असलेल्या एका आरोपीचाही समावेश आहे. आरोपींच्या ताब्यातून 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
राहुल नेवासा भोसले (वय 22, रा. वाळकी, ता. नगर), दगू बडोद भोसले (वय 27, रा. पढेगाव, ता. कोपरगाव) आणि उरूस ज्ञानदेव चव्हाण (वय 30, रा. वाळकी, ता. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी दगू भोसले तीन वर्षांपासून मोक्क्याच्या गुह्यात फरार होता. त्याच्याविरोधात गंभीर प्रकारचे सहा गुन्हे दाखल आहेत.
नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारात बुधवारी (दि. 14) हर्षल चौधरी यांना स्वस्तात गोडतेलाचे डबे देतो, असे सांगून आरोपींनी बोलावून घेतले होते. चौधरी तेथे आल्यानंतर त्यांना निर्जनस्थळी नेऊन मारहाण करून त्यांच्याकडील 76 हजार रुपयांचा ऐवज आरोपींनी दरोडा टाकून चोरला होता. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात हर्षल चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नेमण्यात आले होते. दरम्यान, हा गुन्हा राहुल भोसले याने केल्याची माहिती पोलीस निरीक्षक कटके यांना माहिती मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाळकी येथे सापळा लावून आरोपी भोसले याला पाठलाग करून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दगू भोसले आणि उरूस चव्हाण यांच्या साथीने हा गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर पथकाने आरोपी भोसले आणि चव्हाण यांना ताब्यात घेतले.






