अलिबाग (प्रतिनिधी राजेश आष्टे) – मार्केटयार्डातून व्यापाऱ्याने खरेदी केलेल्या 7 लाख 66 हजार रूपयांचे तेलडबे कमी भाड्यात अलिबागला घेऊन जाण्याच्या बहाण्याने टेम्पोचालक पसार झाला आहे. या प्रकरणी टेम्पो चालक राजेश देवासीविरुद्ध मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र जैन (वय – 55, रा. अलिबाग, रायगड) यांनी फिर्याद दिली आहे.
जैन हे किराणा मालाचे होलसेल व्यावसायिक आहेत. पुण्यातील मार्केटयार्ड मधून माल घेऊन ते अलिबागमध्ये विक्री करतात. टेम्पोचालक देवासी याने यापुर्वी दोन ते तीन वेळा जैन यांनी खरेदी केलेला माल अलिबागमध्ये पोचविला होता. त्यामुळे जैन यांचा देवासीवर विश्वास बसला होता.
जैन यांनी गुरूवारी मार्केटयार्डासह पिसोळीमधून तेलाचे डबे खरेदी केले होते. संबंधित तेलाचे डबे अलिबागला घेऊन जायचे होते. त्यासाठी जैन यांनी देवासीला संपर्क साधला. त्यावेळी त्याने कमी भाड्यामध्ये माल अलिबागला पोहोच करण्याची खात्री दिली. त्यानुसार त्याने दोन्ही ठिकाणांहून माल घेतला. मात्र, देवासी याने 7 लाख 66 हजार रुपये किंमतीचा माल पोहोच न करता पोबारा केला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.






