प्रसिद्ध लेखक, कादंबरीकार भारत काळे यांचे करोनाने निधन

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – बाराशिव शिक्षण प्रसारक मंडळ, परभणी येथे कार्यरत असलेले प्रसिद्ध लेखक भारत काळे यांचे रविवारी दुपारी चारच्या सुमारास करोनाने निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. गेल्या पंधरा दिवसापासून करोनाशी सुरू असलेली त्यांची झुंज आज थांबली. औरंगाबाद येथे उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

भारत काळे यांना करोनाची लागण झाल्यानंतर औरंगाबाद येथे ६ एप्रिलला एका खाजगी दवाखान्यात त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. काळे हे मराठीतील प्रसिद्ध लेखक होते. ‘ऐसे कुणबी भूपाळ’, ‘दीक्षा’ ही पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. काळे यांच्या निधनाने सर्व मित्र, परिचित आणि साहित्य वर्तुळातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

भारत काळे हे काळाचा वेध घेऊन लेखन करणारे कादंबरीकार आहेत. त्यांनी केलेली मानसशास्त्रीय अंगाची मांडणी ही त्यांच्यातल्या वेगळेपणाची ओळख करून देणारी आहे. त्यांनी मानवी मनाचे अनेक धागे वाचकांच्या‍ समोर आपल्या साहित्यातून मांडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here