नवी दिल्ली – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्लीत आज सोमवारी रात्री १० वाजल्यापासून ते सोमवारी २६ एप्रिलपर्यंत (सकाळी ६ वाजेपर्यंत) लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सोमवारी केली.
खाद्य पदार्थ सेवा, औषध पुरवठा आदी अत्यावश्यक सेवा सुरुच राहतील. विवाह सोहळ्यासाठी केवळ ५० लोकांनाच उपस्थित राहता येईल, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे. हा खूप कमी कालावधीचा म्हणजेच ६ दिवसांचा लॉकडाऊन आहे. त्यासाठी स्थलांतरित कामगारांनी दिल्ली सोडून जाऊ नये. मला खूप आशा आहे की आम्हाला यापुढे लॉकडाऊन वाढविण्याची गरज भासणार नाही. सरकार तुमची काळजी घेईल, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीचा उपयोग ऑक्सिजन, औषधे उपलब्ध करण्यासाठी केला जाईल. दिल्लीत आणखी बेड्स उपलब्ध केले जातील, असेही त्यांनी म्हटले आहे. दिल्लीतील कोरोनाचे संकट गंभीर होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर मोठी मैदाने, मंदिर परिसर तसेच रिकाम्या जागांवर कोव्हिड उपचार केंद्रांची स्थापना करण्याचे काम दिल्ली सरकारने वेगाने चालू केले आहे. दिल्लीतील कोरोना रुग्णांची दैनिक संख्या आता २५ हजारांच्या पुढे गेली आहे.
रुग्णवाढीच्या प्रचंड वेगामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे. कोरोना संकट कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने विविध प्रकारचे प्रतिबंध घातले असले तरी त्याचा फारसा परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. दिल्लीबरोबरच शेजारी राज्यातील रूग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत असल्याने ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि बेड्सचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याने रुग्णांचे हाल सुरु आहेत.







