लखनऊ (उत्तरप्रदेश) – कोरोनाचा वाढता प्रभाव सध्या संपूर्ण देशात पहायला मिळत आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश तसेच उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा कहर अद्याप सुरु आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी स्वतःची तसेच कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आहे. कारण कोरोनाच्या विळख्यात आल्यामुळे कुटुंबच्या कुटुंबं उद्ध्वस्त झाल्याचं समोर येत आहे. आता उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमधून देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
एकाच कुटुंबातील तीन भावांच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरी येथे खळबळ उडाली आहे. हे तीन भाऊ गेल्या 1 आठवड्यापासून तापामुळे त्रस्त होते. त्यांना श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास जाणवत होता. धक्कादायक बाब म्हणजे 24 तासातच त्यांनी एकामागून एक प्राण सोडले, यामुळे संपूर्ण कुटुंब हादरलं असून हा परिसर देखील सील करण्यात आला आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, तिन्ही भावांची वयं अनुक्रमे 53, 50 आणि 45 वर्षे अशी होती. न्यूमोनिया झाल्याची तक्रार घेऊन ते दवाखान्यात आले होते, मात्र त्यानंतर त्या सर्वांची प्रकृती वेगाने खालावली. श्वास घेण्यात त्रास होत असल्याचे त्यांनी नमूद केले आणि त्यानंतर तिघेच्या तिघे भाऊ 24 तासांत मरण पावले. मोठा भाऊ घरीच मरण पावला होता, तर इतर दोन भावांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनूसार, तिघा भावांना त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. प्राथमिक लक्षणंही कोरोनाची होती त्यामुळे त्यांनी कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार तिघा भावांनी स्वतःची कोरोनाची टेस्ट देखील केली होती. मात्र त्यांच्या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
लखीमपूर खेरीचे सीएमओ मनोज अग्रवाल यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘प्राथमिक तपासात तरी तिन्ही भावांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे, असं दिसत नाही. आम्ही पुढील अहवालाची प्रतीक्षा करत आहोत. त्यानंतरच या भावांच्या मृत्यूसंदर्भात ठोस माहिती समोर येऊ शकते.’ गेल्या 24 तासांत जिल्ह्यात कोरोनामधून केवळ दोन जणांचा मृत्यू झाला आहे, या मुद्द्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
दरम्यान, खासगी रुग्णालयात दोन भावांवर उपचार करणार्या डॉक्टरांनी देखील यावर भाष्य केलं आहे. ‘जेव्हा त्यांना दवाखान्यात आणलं गेलं तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आम्ही त्यांना ताबडतोब ऑक्सिजनच्या सपोर्टवर ठेवलं. एका आठवड्यापासून त्याची तब्येत खराब होती आणि ते स्वतःवर घरगुतीच उपचार करत होते.’
डॉक्टर पुढं असंही म्हणाले की, ‘सध्या कोरोनाचा काळ आहे. त्यामुळे कोरोनासदृश्य लक्षणं दिसल्यास तातडीने कोरोनाची टेस्ट करुन घ्या, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या. स्वतःच्या मनाने किंवा घरच्या घरी उपचार घेण्याचं टाळा. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या अनेक प्रकरणांमध्ये घरच्या घरी उपचार करण्यात वेळ घालवल्याचं समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत.’






